न्यूझीलंड-अफगाण एकमेव कसोटी नोएडात
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
न्यूझीलंड आणि अफगाण यांच्यात एकमेव कसोटी सामना 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान येथील ग्रेटर नोएडा क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडचे नेतृत्व टीम साऊदीकडे तर अफगाणचे नेतृत्व हसमत्तुल्ला शाहिदीकडे सोपविण्यात आले आहे.
या एकमेव सामन्यासाठी लंकेचा माजी फिरकी गोलंदाज रंगण्णा हेराथ याची न्यूझीलंड संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हेराथच्या नियुक्तीमुळे न्यूझीलंड संघातील फिरकी गोलंदाज अझाझ पटेल याचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. भारतातील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असल्याने हेराथ यांचे मार्गदर्शन आपल्याला अधिक उपयोगी ठरेल, असा विश्वास पटेलने व्यक्त केला आहे.
न्यूझीलंड संघामध्ये ब्लंडेल, ब्रेसवेल, कॉनवे, हेन्री, लॅथम, मिचेल, ओरुरकी, अझाझ पटेल, फिलिप्स, रचिन रविंद्र, सँटेनर, विलियमसन, सिरेस आणि यंग यांचा समावेश आहे. अफगाण संघामध्ये इब्राहिम झेद्रान, रियाझ हसन, अब्दुल मलिक, रेहमत शहा, बहिर शहा, इक्रम अलीकिल, एस. कमाल, गुलबदीन नईब, अफसर झेजाई, ओमरजाइ, अकबर, शमसूरमान, कईस अहमद, झहीर खान, निजात मसूद, फरीद अहमद मलिक, नावेद झेद्रान, खलिल अहमद आणि यामा अरब यांचा समावेश आहे. मात्र या सामन्यात रशिद खान खेळणार नाही.