न्यूझीलंड सर्वबाद 132, इंग्लंडचीही दाणादाण
लॉर्ड्सवरील पहिली कसोटी, पहिला दिवस : जिम्मी अँडरसन, पदार्पणवीर मॅथ्यू पॉट्सचे प्रत्येकी 4 बळी, जॅक लीच कन्कशनमुळे सामन्यातून बाहेर
वृत्तसंस्था /लंडन
यजमान इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समधील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 40 षटकात अवघ्या 132 धावांमध्येच खुर्दा झाला. अष्टपैलू कॉलिन डे ग्रँडहोमने नाबाद 42 धावांसह एकाकी झुंज दिली. इंग्लंडचा अनुभवी सीमर जिम्मी अँडरसन (4-66) व पदार्पणवीर मॅथ्यू पॉट्स (4-13) यांनी प्रत्येकी 4 बळी घेत किवीज डावाला भगदाड पाडले. मात्र, प्रत्युत्तरात इंग्लंडची देखील पहिल्या डावात 7 बाद 116 अशी दाणादाण उडाली.
प्रारंभी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, याचा त्यांना फटकाच अधिक बसला. अँडरसनने डावातील पहिल्या टप्प्यात टॉम लॅथम व विल यंग या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद करत जोरदार धक्के दिले. त्यानंतर ब्रॉडने डेव्हॉन कॉनव्हेला बाद केले तर पॉट्सने किवीज कर्णधार केन विल्यम्सनला ड्रेसिंगरुमचा रस्ता दाखवत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपला पहिला बळी नोंदवला. नंतर त्याने डॅरेल मिशेल व टॉम ब्लंडेल यांना बाद करत पहिला बळी फ्ल्यूक नव्हता, याची प्रचिती दिली. इंग्लंडचा संघ नवा कर्णधार बेन स्टोक्स व नवे प्रशिक्षक ब्रेन्डॉन मॅक्युलम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मैदानात उतरला आहे.
न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध मागील वर्षी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला होता. शिवाय, त्यांनी भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलही जिंकली होती. या लढतीत न्यूझीलंडला दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या हेन्री निकोल्सशिवाय खेळावे लागले आहे. ट्रेंट बोल्ट मात्र तंदुरुस्त होत संघात दाखल झाला आहे.
इंग्लंडने जलद गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांना अंतिम एकादशमध्ये स्थान दिले. मॅथ्यू पॉट्सने इंग्लंडतर्फे पदार्पण केले तर ऍलेक्स लीस सलामीला उतरणे निश्चित केले गेले.
या संघाचे माजी प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प आजारी असल्याने त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेकीला जाताना त्यांचे नाव व त्यावर त्यांचा कसोटीपटूचा क्रमांक असलेली जर्सी परिधान केली होती. जॅक लीच कन्कशनमुळे उर्वरित सामन्यात खेळणार नाही.
इंग्लंडचीही घसरगुंडी
न्यूझीलंडला पहिल्या डावात सर्वबाद 132 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडची देखील या लढतीत चांगलीच घसरगुंडी उडाली. पहिल्या दिवसअखेर त्यांना 36 षटकात 7 बाद 116 धावांवर समाधान मानावे लागले. एकवेळ इंग्लंडचा संघ 2 बाद 92 असा सुस्थितीत होता. मात्र, जो रुट तिसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला आणि त्यानंतर पाहता पाहता इंग्लंडची 7 बाद 116 अशी दाणादाण उडाली. साऊदी, बोल्ट, जेमिसन यांनी प्रत्येकी 2 तर कॉलिन डे ग्रँडहोमने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव : 40 षटकात सर्वबाद 132 (कॉलिन डे ग्रँडहोम 50 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 42, टीम साऊदी 26, टॉम ब्लंडेल 14, डॅरेल मिशेल 13. अवांतर 3. मॅथ्यू पॉट्स 4-13, अँडरसन 4-66, ब्रॉड-स्टोक्स प्रत्येकी 1 बळी).
इंग्लंड पहिला डाव : 36 षटकात 7 बाद 116 (झॅक क्राऊली 56 चेंडूत 7 चौकारांसह 43, ऍलेक्स लीस 77 चेंडूत 2 चौकारांसह 25., जो रुट 11. अवांतर 18. टीम साऊदी 40 धावात 2 बळी, ट्रेंट बोल्ट 15 धावात 2 बळी, काईल जेमिसन 20 धावात 2 बळी, ग्रँडहोम 1-24).