For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिथी प्राध्यापकांना नववर्षाची भेट

06:34 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
अतिथी प्राध्यापकांना नववर्षाची भेट
Advertisement

विविध मागण्या मान्य : 1 जानेवारीपासून 5 हजार रु. मानधनवाढ

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

अनेक दिवसांपासून मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अतिथी प्राध्यापकांची राज्य सरकारने अखेर दखल घेतली आहे. अतिथी प्राध्यापकांना विमा, 5 हजार रुपये वेतनवाढीसह विविध सुविधा देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे. मानधनवाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement

अतिथी प्राध्यापक संघटनेच्या मागण्यांसंदर्भात शुक्रवारी उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. शैक्षणिक आर्हता, अनुभवाच्या आधारे अतिथी प्राध्यापकांना सध्या 26,000 रुपये ते 32,000 रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. राज्यात सध्या 10,600 अतिथी प्राध्यापक आहेत. या सर्वांना वेतनवाढीचा समान लाभ मिळणार आहे. 1 जानेवारीपासूनच मानधनवाढ लागू केली जाईल. यामुळे सरकारवर वर्षाला 55 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे, असे मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी सांगितले.

5 लाखापर्यंत आरोग्यविमा

अतिथी प्राध्यापकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याजोगी आरोग्यविमा सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना 400 रुपये प्रिमियम भरावा लागेल. उर्वरित 400 रुपये राज्य सरकार देईल. याकरिता 5 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. तांत्रिक शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक कॉलेजमधील अतिथी प्राध्यापकांनाही या सर्व सुविधा लागू होतील.

निवृत्तीनंतर मिळणार ठराविक रक्कम

अतिथी प्राध्यापक म्हणून किमान 10 वर्षे सेवा बजावून वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होताना त्यांना सेवाकालावधीनुसार वर्षाला 50 हजार रुपयेप्रमाणे (10 वर्षे सेवा बजावल्यास वर्षाला 50 हजार रु. प्रमाणे एकूण 5 लाख रु.) रक्कम दिली जाणार आहे.

कायमस्वरुपी नेमणुकीसाठी ग्रेसमार्क

अतिथी प्राध्यापकांना दरवर्षी कौन्सिलिंगला हजर अनिवार्य असले तरी त्यांच्याकडून नव्याने अर्ज मागविण्याऐवजी मागील वर्षी दिलेल्या अर्जाचाच विचार करण्यात येत आहे. याकरिता याकरिता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यापूर्वीची सेवा विचारात घेऊन विशेष नेमणूक नियमावली तयार करावी. साहाय्यक प्राध्यापक नेमणुकीवेळी अतिथी प्राध्यापकांना ग्रेस मार्क देण्याचाही विचार करण्यात आला. त्यानुसार ग्रेस मार्कासाठी अतिथी प्राध्यापकांनी कमाल 5 वर्षे सेवा बजावणे आवश्यक आहे. त्यांना वर्षाला 1 टक्का यानुसार कमाल 5 टक्के ग्रेसमार्क देण्याचा नियम तयार केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

महिन्यातून एक दिवस पगारी रजा

अतिथी प्राध्यापकांना महिन्यातून एक दिवस पगारी रजा देण्याबाबत विचार करण्यात आला आहे. सुटीच्या दिवशीचा कार्यभार इतर दिवशी भरून काढण्याची अट घालण्यात आली आहे. आठवड्यातून 15 ते 19 तास काम करणाऱ्या अतिथी प्राध्यापकांना महिन्याला एक दिवस रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी पूर्णवेळ प्राध्यापक आणि अतिथी प्राध्यापकांमध्ये कोणताही भेद करू नये. अतिथी प्राध्यापकांनाही सन्मानाची वागणूक द्यावी, यासंबंधी 12 डिसेंबर रोजीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत सूचना केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

...अन्यथा पर्यायी मार्ग अवलंबणार!

अतिथी प्राध्यापकांच्या मागण्या, समस्या सोडविण्याच्या बाबतीत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकारचे निर्णय मान्य करून 1 जानेवारी 2024 पासून सर्व अतिथी प्राध्यापकांनी कॉलेजमध्ये हजर राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे. जर गैरहजर राहिल्यास सरकार विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने नियमानुसार पुढील पर्याय हाती घेईल, असा इशाराही उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिला.

Advertisement
Tags :

.