‘गगनयान’ला नवे पंख
मोहिमेसाठी 4 वैमानिकांची निवड : 40 वर्षांनंतर भारतीय अंतराळात पोहोचणार
भारताने अलिकडेच गगनयान मोहिमेच्या अंतर्गत अंतराळात पहिल्या उड्डाणसाठी निवडलेल्या 4 अंतराळवीरांची ओळख जगाला करून दिली आहे. गगनयान अंतराळासाठी झेपावत असताना हे अंतराळवीर स्वदेशी अंतराळयानातून अंतराळासाठी उड्डाण करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. यापूर्वी 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी अंतराळासाठी उड्डाण केले होते, परंतु ती मोहीम पूर्णपणे सोव्हियत महासंघ म्हणजेच आताच्या रशियाकडून संचालित करण्यात आली होती.
गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेले सर्व अंतराळवीर हे भारतीय वायुदलाचे अधिकारी आहेत. ग्रूप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रूप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रूप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला अशी या शूरांची नावे आहेत. हे सर्व जण वायुदलाचे टेस्ट पायलट असून त्यांच्याकडे 2-3 हजार तासांच्या वैयक्तिक उड्डाणाचा अनुभव आहे. नव्या किंवा मोडिफाइट विमानांचे उ•ाण करत त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या वैमानिकांना टेस्ट पायलट म्हटले जाते.
ही चार नावे किंवा चार व्यक्ती नाहीत, तर 140 कोटी आकांक्षांना अंतराळात नेणाऱ्या शक्ती आहेत. 40 वर्षांनंतर भारतीय अंतराळात पोहोचणार आहे. यावेळी वेळ देखील आमची आहे, काउंटडाऊन देखील आमची असेल आणि रॉकेट देखील आमचे असेल असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या वैमानिकांच्या नावांची घोषणा करताना काढले होते.
गगनयान ही भारताची तीनदिवसीय महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असून याच्या अंतर्गत पहिल्यांदाच अंतराळवीरांना अंतराळात 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठविले जाणार आहे. तेथून हे अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत. इस्रोनुसार 2024 मध्ये एक टेस्ट फ्लाइट रोबोटला अंतराळात नेण्यात येणार आहे, यानंतर 2025 मध्ये अंतराळवीरांसोबत गगनयान मोहीम साकारली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरली तर भारत स्वदेशी रॉकेटचा वापर करून स्वत:च्या अंतराळवीरांना अंतराळात नेणाऱ्या निवडक देशांच्या समुहात सामील होणार आहे. यापूर्वी अशी कामगिरी केवळ अमेरिका, रशिया आणि चीनने साध्य केली आहे. गगनयान मोहीम पूर्ण झाल्यावर भारत अशाप्रकारचे यश मिळविणारा चौथा देश ठरणार आहे.
गगनयान मोहिमेसाठी या चारही अंतराळवीरांची निवड 2019 मध्येच करण्यात आली होती. परंतु 5 वर्षांपर्यंत त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली होती. इस्रोने या वैमानिकांच्या क्लासरुम, फिजिकल फिटनेस, सिम्युलेटर आणि फ्लाइट सूट प्रशिक्षणासाठी बेंगळूरमध्ये एक अंतराळवीर प्रशिक्षण सुविधा केंद्र स्थापन केले होते. इस्रोनुसार तेथे अकॅडेमिक कोर्सेस, गगनयान उ•ाण प्रणाली, सर्वाइवल ट्रेनिंगसोबत एअरोमेडिकल प्रशिक्षण, वेळावेळी उ•ाणाचा सराव आणि योग देखील त्यांचा प्रशिक्षणाचा हिस्सा होते.
रशियात खडतर प्रशिक्षण
गगनयानसाठी 4 ही वैमानिकांनी रशियात 13 महिन्यांपर्यंत खडतर प्रशिक्षण घेतले आहे आणि आता भारतात देखील त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. तिरुअनंतपुरम येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता, ज्यात हे सर्व वैमानिक जिममध्ये घाम गाळण्यासोबत स्विमिंग यासारखे व्यायाम आणि योग करताना दिसून आले. 4 पैकी 3 वैमानिक हे अंतराळप्रवासावर जाणार असल्याचे तर एक वैमानिक बॅकअप म्हणून राहणार असल्याचे बोलले जात आहे. या चारही वैमानिकांची नावे समोर आल्यावर सर्वसामान्य लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जिज्ञासा आहे.
ग्रूप कॅप्टन बालकृष्णन नायर
26 ऑगस्ट 1976 रोजी केरळच्या तिरुवजियाद येथे जन्मलेले ग्रूप कॅप्टन नायर हे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत. तसेच वायुदल अकॅडमीत स्वोर्ड ऑफ ऑनरने ते सन्मानित राहिले आहेत. 19 डिसेंबर 1998 रोजी भारतीय वायुदलाच्या फायटर स्ट्रीममध्ये नायर यांना नियुक्त करण्यात आले होते. नायर हे एक उड्डाण प्रशिक्षक आणि टेस्ट पायलट असून त्यांच्याकडे सुमारे 3 हजार तासांचा उ•ाण अनुभव आहे. फ्रंटलाइन सुखोई-30एमकेआय, मिग-21, मिग-29, हॉक, डोर्नियर आणि एएन-32 समवेत अनेक विमानांचे त्यांनी उ•ाण केले आहे. याचबरोबर त्यांनी एक लढाऊ सुखोई-30 स्क्वाड्रनची धुरा सांभाळली आहे.
ग्रूप कॅप्टन अजित कृष्णन
ग्रूप कॅप्टन कृष्णन हे देखील एनडीएचे माजी विद्यार्थी राहिले आहेत. कृष्णन यांचा जन्म 19 एप्रिल 1982 रोजी चेन्नईत झाला होता. कृष्णन यांना वायुदल अकॅडमीमध्ये प्रेसिडेंट गोल्ड मेडल आणि स्वॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले होते. कृष्णन यांना 21 जून 2003 रोजी भारतीय वायुदलाच्या फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आले होते. ग्रूप कॅप्टन नायर यांच्याप्रमाणेच कृष्णन हे देखील उड्डाण प्रशिक्षक तसेच टेस्ट पायलट आहेत. कृष्णन यांच्याकडे 2900 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. कृष्णन यांनी सुखोई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जग्वार, डोर्नियर आणि एएन-32 समवेत अनेक प्रकारच्या विमानांचे उ•ाण केले आहे.
ग्रूप कॅप्टन अंगद प्रताप
ग्रूप कॅप्टन अंगद प्रताप हे मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत. 17 जुलै 1982 रोजी प्रयागराज येथे त्यांचा जन्म झाला होता. अंगद प्रताप हे देखील एनडीएमधूनच वायुदलात सामील झाले होते. 18 डिसेंबर 2004 रोजी त्यांची नियुक्ती भारतीय वायुदलाच्या फायटर स्ट्रीममध्ये झाली होती. एक उ•ाण प्रशिक्षक आणि टेस्ट पायलट म्हणून अंगद यांच्याकडे सुमारे 2 हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. अंगद यांनी सुखोई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एएन-32 यासारख्या विमानांचे उड्डाण केले आहे.
विंग कमांडर शुभांशु शुक्ला
10 ऑक्टोबर 1985 रोजी उत्तरप्रदेशच्या लखनौमध्ये जन्मलेले विंग कमांडर शुक्ला हे एनडीएमधून पासआउट झालेले आहेत. तसेच 17 जून 2006 रोजी भारतीय वायुदलाच्या फायटर स्ट्रीममध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. शुक्ला यांच्याकडे सुमारे 2 हजार तासांच्या उड्डाणाच्या अनुभवासोबत फायटर कॉम्बॅट लीडर तसेच टेस्ट पायलट आहेत. त्यांनी सुखोई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एएन-32 यासारख्या विमानांचे उ•ाण केले आहे.
अंतराळक्षेत्रात भारताची झेप
मागील दोन दशकांमध्ये अंतराळाच्याक्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. मागील वर्षी भारताच्या अंतराळ संस्थेने म्हणजेचे इस्रोने अंतराळाच्या क्षेत्रात इतिहास रचला होता. ऑगस्ट 2023 मध्ये भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर स्वत:चा रोव्हर उतरवत अशाप्रकारची कामगिरी करणारा पहिला देश ठरण्याचा मान मिळविला होता. याच्या काही आठवड्यांनी इस्रोने सूर्याच्या दिशेने भारताची पहिली ऑब्जर्वेशन मिशन आदित्य-एल1 प्रक्षेपित केला होता. हे यान सध्या कक्षेत राहून सूर्याचे अध्ययन करत आहे. भारताने काही दशकांपासून बहुप्रतीक्षित अन् महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली आहे. 2035 पर्यंत भारत स्वत:चे पहिले अंतराळस्थानक स्थापन करणार आहे. तर 2040 पर्यंत चंद्रावर स्वत:चा अंतराळवीर पाठविणार आहे.
2024 गगनयान मोहिमेच्या तयारीचे वर्ष
गगनयान मोहिमेविषयी पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम 2018 मधील स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून केली होती. चालू वर्षं हे गगनयान मोहिमेच्या तयारीचे वर्ष असेल असे इस्रो प्रमुख सोमनाथ यांनीच स्पष्ट केले आहे. मानवयुक्त अंतराळ उ•ाणाच्या दिशेने भारताचे हे पहिले पाऊल असणार आहे. त्यानंतर पुढील पाऊल हे अंतराळस्थानक स्थापन करणे आणि 2040 पर्यंत चंद्रावर माणूस पाठविण्याचे असणार आहे. गगनयान मोहीम अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एका अनुकूल काळात राबविली जाणार आहे. अमेरिकेत आता खासगी कंपन्यांनी अंतराळपर्यटनास सुरुवात केली आहे. तर स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून अंतराळवीरांना नेण्याची आणि आणण्याची प्रक्रिया पार पाडत आहे. तर बोइंग कंपनीचा बहुप्रतीक्षित स्टारलाइनर एप्रिल महिन्यात चलाक परीक्षण उ•ाणासोबत या बाजारात प्रवेश करणार आहे. ड्रॅगन आणि स्टारलाइनर हे दोन्ही इस्रोच्या गगनयान कॅप्सूलच्या आकाराइतकेच आहेत. तर दुसरीकडे स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन या कंपन्या लोकांना चंद्रावर नेऊ शकेल अशाप्रकारचे अंतराळयान डिझाइन करत आहेत.
गगनयानमुळे काय साध्य होणार?
इस्रोनुसार गगनयान मोहिमेचा उद्देश मानवयुक्त यानाला एलईओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेण्याडच्या स्वदेशी क्षमतेचे प्रदर्शन करणे आहे. या मोहिमेमुळे भारताला अनेक मोठे लाभ प्राप्त होणार आहेत. यात भविष्यात जागतिक अंतराळस्थानकाच्या विकासात सक्रीय भूमिका पार पाडण्याची क्षमता आणि देशाच्या हिताकरता प्रयोग करता येणार आहेत. गगनयान मोहिमेसाठी अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांची गरज भासली. यात ह्यूमन रेटेड लाँच व्हेईकल, क्रू एस्केप सिस्टीम्स, हॅबिटेबल ऑर्बिटल मॉड्यूल, लाइफ सपोर्ट सिस्टीमचा समावेश होता. या मोहिमेकरता भारताला 9 हजार 23 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.