9 सप्टेंबरला ठरणार नवा उपराष्ट्रपती
आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा : मतदानादिवशीच निकालही जाहीर होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या उपराष्ट्रपतीपद निवडणुकीच्या तारखेची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. निवडणूक आयोगाने शुक्रवारी यासंबंधी माहिती जारी करत नामांकनापासून ते मतदानाच्या तारखेपर्यंतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नवा उपराष्ट्रपती निवडण्यासाठी 9 सप्टेंबर 2025 रोजी निवडणूक होणार असून त्याचदिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सादर केल्यापासून उपराष्ट्रपती पद रिक्त आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तत्पूर्वी, या निवडणुकीसाठी 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज सादर करता येतील. 22 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. 9 सप्टेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्यास मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. अर्थातच, अर्ज माघारीनंतर म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार की नाही याचा उलगडा होईल.
भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत, निवडणूक आयोग भारताच्या उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणुका घेते. संविधानाच्या कलम 66 (1) नुसार, भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे निवडून आलेले सदस्य असलेल्या निवडणूक मंडळाद्वारे केली जाते. उपराष्ट्रपती निवडणुकीत राज्यसभेचे 233 निवडून आलेले खासदार, राज्यसभेचे 12 नामनिर्देशित खासदार आणि लोकसभेचे 543 खासदार मतदान करू शकतात. अशाप्रकारे, एकूण 788 लोक मतदान करू शकतात. तथापि, दोन्ही सभागृहांची प्रभावी संख्या 782 असून सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला तर विजयी उमेदवाराला 391 मतांची आवश्यकता असेल. या निवडणुकीत मतदाराला पसंतीच्या आधारावर मतदान करावे लागते. ही संपूर्ण प्रक्रिया मतपत्रिकेवर गुप्त मतदान प्रणालीद्वारे केली जाते.
दोन्ही सभागृहांचे गणित
सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आगामी निवडणुकीत स्पष्ट आघाडी असल्याने सत्ताधाऱ्यांनी दिलेला उमेदवार निवडून येईल हे स्पष्ट आहे. 543 सदस्यांच्या लोकसभेत पश्चिम बंगालमधील बसीरहाटमधील एक जागा रिक्त आहे, तर 245 सदस्यांच्या राज्यसभेत पाच जागा रिक्त आहेत. राज्यसभेतील पाच रिक्त जागांपैकी चार जम्मू काश्मीरमधील आणि एक पंजाबमधील आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजीव अरोरा यांनी राज्य विधानसभेत निवडून आल्यानंतर राजीनामा दिल्यामुळे पंजाबची जागा रिक्त झाली आहे.
कशी होते निवडणूक...
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दोन किंवा अधिक उमेदवार असल्यास निर्धारित दिवशी मतदान घेतले जाते. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार या निवडणुकीसाठीचे मतदार असतात. एकच उमेदवार असेल तर मतदान घेतले जात नाही. निवडणुकीत ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील, त्याची उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली जाते.
उमेदवारासाठी पात्रता
या निवडणुकीसाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा लागतो. त्याचे वय 35 वर्षांच्या वर असावे लागते. तसेच तो लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभा अथवा विधान परिषद यांचा सदस्य नसतो. या सभागृहांचा सदस्य असणारी व्यक्ती या निवडणुकीत उमेदवार असल्यास त्याने त्याचे सदस्यत्व सोडले आहे, असे गृहित धरले जाते. ज्या व्यक्तीकडे सरकारी किंवा स्थानिक स्वराज्यसंस्थांशी संबंधित लाभाचे पद आहे, अशी व्यक्ती या निवडणुकीसाठी उमेदवार असू शकत नाही.
विविध नावांची चर्चा
धनखड यांच्या जागी उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड होणार यासंबंधी आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अनेक नावे समोर येत आहेत. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत असल्याने याच आघाडीचा विजय होणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, उमेदवारी भाजपच्या नेत्याला मिळणार, की मित्रपक्षांना संधी दिली जाणार ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आश्चर्यकारकरित्या घेतले जात आहे. तथापि, ते हा प्रस्ताव मान्य करतील का हा प्रश्न आहे. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांचे नावही चर्चेत असले तरी सत्ताधाऱ्यांकडून धक्कातंत्र देणारे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.