तिसरीच्या विद्यार्थ्यांना अखेर नवीन पाठ्यापुस्तक उपलब्ध
प्रतिनिधी/ मडगाव
तिसरीच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या मराठी पाठ्यापुस्तकातून दोन धडे व एक कविता गायब झाली होती. त्यामुळे शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. पाठ्यापुस्तक परिपूर्ण नसल्याच्या तक्रारी काही शिक्षकांनी आपल्या वरिष्ठांकडे केल्यानंतर आता नव्याने मराठी पाठ्यापुस्तक पुरविण्यात आले असून ते परिपूर्ण आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) मार्फत इयत्ता तिसरीसाठी ‘सुरंगी’ हे मराठी पाठ्यापुस्तक विद्यार्थ्यांना पुरविण्यात आले होते. त्यातील दोन धडे व एक कविता गायब झाली होती. हा प्रकार काही शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या वरिष्ठांना याची कल्पना दिली. त्यावेळी गायब झालेले दोन धडे व एक कवितेची झेरॉक्स प्रत काढून विद्यार्थ्यांना द्यावी, अशी सूचना शाळांना आली.
मात्र, झेरॉक्स प्रत किती विद्यार्थ्यांना देणार व त्यांचा खर्च कोण करणार असा प्रश्न होता. हा गोंधळाचा प्रकार शिक्षण खात्यातील वरिष्ठांपर्यंत पोचल्यानंतर त्यांनी नव्याने पाठ्यापुस्तके पुरविण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे दक्षिण गोव्यातील बऱ्याच शाळांनी तिसरीतील मराठी पाठ्यापुस्तक नव्याने पाठविण्याची व्यवस्था केली.