मानवाचे आयुष्य ‘समृद्ध’ करणारे नवतंत्रज्ञान
डिजिटल माध्यम असो की दैनंदिन जीवन, दोन्हीकडे नवतंत्रज्ञानाचा अवलंब हा सुखावह ठरु लागला आहे. तो आत्मसात करणेच उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचे असणार आहे.
जागतिकीकरणाच्या वादळी वातावरणात नवनवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करणे हे एक आव्हानात्मक काम झाले आहे. नवतंत्रज्ञान खूप वेगाने विकसित केले जाते आहे. पूर्वीच्या काळी संदेश पाठवण्यासाठी पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्रे याचा वापर खूप केला जायचा आणि अतिशय आणीबाणीच्या प्रसंगी ‘तार’ म्हणजेच टेलिग्राम करणे हाच पर्याय असायचा. मग लँडलाईन टेलिफोन आले. ही सुविधा दहा लाख लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तब्बल 75 वर्षांचा कालावधी लागला. मग ‘पेजर’ आले आणि गेले. त्यानंतर मोबाईल फोन आणि स्मार्ट मोबाईलने नवी क्रांती आणली. त्यानंतर ‘नेटफ्लिक्स’ ने मनोरंजन क्षेत्रात नवी लाट आणली. दहा लाख लोकांपर्यंत पोहचायला ‘नेटफ्लिक्स’ला साडेतीन वर्षे लागली. त्यानंतर ‘ट्विटर’चा उदय झाला. फक्त दोन वर्षांच्या कालावधीत दहा लाख लोक ‘ट्विटर वापरू लागले. मग मार्क झुकेरबर्गने ‘फेसबुक’ सुरु केले. ते अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाले. तरीही दहा लाख वापरकर्त्यांच्या टप्पा गाठायला फेसबुकला दहा महिने लागले. डिसेंबर 2022 मध्ये ‘चॅट जीपीटी’चा उदय झाला आणि पुन्हा तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ माजली. अवघ्या पाच दिवसात विक्रमी दहा लाख वापरकर्त्यांचा टप्पा ‘चॅट जीपीटी’ने गाठून नवा विक्रम केला. नवतंत्रज्ञान विकासाचा वेग आता खूपच वाढला आहे. अमेरिका आणि चीनमधील जागतिक आघाडीच्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर ‘नवतंत्रज्ञान’ संशोधन आणि विकास यावर मोठी गुंतवणूक करीत आहेत. जगात अग्रेसर रहायचे असेल तर नवतंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर असणे हाच एकमेव पर्याय आहे.
स्टीव्ह जॉब यांनी आपल्या नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या साहाय्याने ‘अॅपल’ ही कंपनी घडवली. नवतंत्रज्ञान कसे असावे आणि त्याचा वापर जागतिक आघाडीची कंपनी घडविण्यासाठी म्हणून कसा करावा ह्याचे सर्वोकृष्ट उदाहरण म्हणजे स्टीव्ह जॉब आणि त्याने घडवलेली ‘अॅपल’ कंपनी. अॅपलच्या बहुप्रतिक्षित ओव ड्रॉपिंग इव्हेंटमध्ये अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी आयफोन 17प्रो आणि प्रो मॅक्स लाँच केले. हे फोन पूर्णपणे नव्याने डिझाईन केले आहेत. कागदासारखा पातळ आयफोन हा इतिहासातील सर्वांत बेस्ट आहे असे कंपनीकडून म्हटले आहे. ही कंपनी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सर्विसेसमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अॅपल मीडिया प्लेअर, संगणक, हार्डवेअर उपकरणे आणि बरेच काही विकते, विकसित करते आणि समर्थन देते. 2024 मध्ये, आयफोन्सची विक्री $ 232 बिलियनपर्यंत पोहोचली. ते अॅपलच्या एकूण कमाईच्या ($394 अब्ज) जवळपास 59 टक्के आहे. अॅपलचे शेअर्स $ 258.20 वर पोहोचले, जो या शेअरचा सर्वकालीन उच्चांक आहे. त्यात गेल्या 6 महिन्यांत 23 टक्के आणि वर्षात सुमारे 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे कंपनीचे बाजारभांडवल सुमारे $4 ट्रिलियनवर पोहोचले. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, जगातील 177 देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक अॅपलच्या कंपनीचे बाजारमूल्य आहे.
दुसरीकडे याच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातील आरोग्य क्षेत्रात हवाहवासा बदल होताना दिसतो आहे. भारतातील आरोग्यसेवेचे भविष्य नावीन्यपूर्ण आणि संशोधनाद्वारे झपाट्याने बदलत आहे. टेलिमेडिसिन आणि ई-संजीवनी सारख्या प्लॅटफॉर्मने देशातील दुर्गम भागातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तांत्रिक प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल आरोग्य उपायांद्वारे देशाची आरोग्य सेवा अधिक सुलभ, परवडणारी आणि प्रभावी होत आहे. AI तंत्रज्ञान क्ष-किरण आणि सीटी स्कॅनचे विश्लेषण करते, जे क्षयरोग आणि फुफ्फुसाचे आजार लवकर ओळखण्यास मदत करते. टेलिमेडिसिनमध्ये, Practo आणि 1mg सारखे प्लॅटफॉर्म डॉक्टरांशी सल्लामसलत करत आहेत आणि ग्रामीण भागात औषधांचा पुरवठा सुलभ करत आहेत.
हे आरोग्याच्याबाबतीत होत असताना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती समृद्धीची वाट धरु लागली असल्याचे दिसते आहे. सतत बदलणाऱ्या हवामान आणि बाजारपेठेच्या परिस्थितीत पारंपरिक शेती टिकवणे आव्हानात्मक झाले आहे. अशावेळी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. आधुनिक शेती म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या पद्धतींचा वापर करून शेती अधिक उत्पादक, फायदेशीर आणि टिकाऊ बनवण्याची प्रगत प्रक्रिया. पारंपरिक पद्धतींपेक्षा ही शेती अधिक अचुक, डेटा-आधारित आणि संसाधनस्नेही असते. यामध्ये जमिनीची गुणवत्ता, हवामान, सिंचन, खतांचा अचुक वापर आणि उत्पादन व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, IoT (Internet of Things), ड्रोन, सेन्सर्स, सौर ऊर्जा, मोबाईल अॅप्स आणि डेटा अॅनालिटिक्स यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश होतो. आपण यांचा वापर करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करायला पाहिजे. याने आपल्या उत्पादनात वाढ होते. तसेच वेळसुद्धा वाचतो. डिजिटल यंत्रणा, वैज्ञानिक पद्धती आणि तांत्रिक साधनांचा योग्य वापर केल्यास शेती अधिक उत्पादक, फायदेशीर आणि पर्यावरणपूरक बनू शकते. आधुनिक शेतीत शेतकऱ्याला केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही सक्षम बनवण्याची ताकद आहे. आज गरज आहे ती फक्त मनाच्या बदलाची. “जुनं जपतानाच नव्याला स्वीकारणं हीच खरी प्रगती!” आधुनिक शेती म्हणजे शेतकऱ्याच्या मेहनतीला टेक्नॉलॉजीची साथ देणं आणि ही जोडी शाश्वत विकासाची हमी देते.
तंत्रज्ञान हेच प्रगतीचे ग्रोथ इंजिन असणार आहे हे समजावून घेणे आवश्यक आहे. यासाठी ‘संशोधन आणि विकास’ यावर गुंतवणूक करणे गरजेचे आहे. 2012 पासून जीडीपीच्या 0. 7 टक्के इतक्याच जेमतेम रकमेची तरतूद ‘संशोधन आणि विकास’ यासाठी दरवर्षी केली जात आहे. ही तरतूद अत्यंत अपुरी आहे. यामुळे संशोधन कारणाऱ्यांची संख्याही प्रचंड रोडावली आहे. दहा लाख व्यक्तीमागे फत्त 255 व्यक्ती संशोधनात आहेत. ‘जुने ते सोने’ ही गोष्ट तंत्रज्ञानाला लागू नाही. प्रगत देश तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे पुढे आले, हा मूलमंत्र समजावून घेतला पाहिजे. आपण आज जे तंत्रज्ञान वापरतो ते पूर्वी नव्हते पुढे आणखी निराळे येणारच आहे. जे अधिक ज्ञानी आणि तंत्रज्ञांनी त्यांनाच संधी प्राप्त होणार आहेत. तंत्रज्ञान प्रगतीचा वेग अफाट आहे. आपली प्रगती खूपच संथ आहे. सतत बदलत्या काळाचे आव्हान पेलायचे असेल तर नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योग उभारले गेले पाहिजेत. आणि हे ‘नवतंत्रज्ञान’ नक्कीच आपले जीवन समृद्ध तर करणार आहेच शिवाय अनेक जटील समस्या सहजरीत्या सोडवणार देखील आहे.
प्रा. डॉ. गिरीश नाईक