नव्या जगात ड्रोन युद्धाचे नवे तंत्र
भविष्यकाळामध्ये अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणती मध्यस्थाची भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. पुतीन यांना थोडेसे आवरावे. झेलेन्स्की यांना सबुरीचा सल्ला द्यावा आणि दोन्ही बाजूंनी एक पाऊल पुढे व एक पाऊल मागे घेऊन युद्ध थांबवावे, अशी सर्वांची इच्छा आहे.
बदलत्या जगात युद्धतंत्रही बदलत आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मानवविरहीत उपकरणे शत्रूच्या प्रदेशावर सोडण्यासाठी ड्रोनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. खरेतर, ड्रोन तंत्र हे शेतीवरील औषध फवारणी तसेच पीक सर्वेक्षण, वसाहतींची नोंद इत्यादी कारणासाठी उत्तमप्रकारे वापरले जाते. पण याच तंत्रज्ञानाची दुसरी बाजू म्हणजे याचा उपयोग युद्धामध्ये केवळ टेहळणीच नव्हे तर संहारासाठीही केला जाऊ शकतो. या बदलत्या युद्धतंत्राची व्यापक प्रचिती मागील रविवारी युक्रेन-रशिया यांच्यात अडीच वर्षे चाललेल्या युद्धामध्ये दिसून आली. दोन्ही बाजूंनी आक्रमकपणे ड्रोनचा वापर करून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
गेल्या अडीच वर्षातील रशिया-युक्रेन युद्धात मागील आठवडा कमालीचा धक्कादायक ठरला. युक्रेनने आतापर्यंतचा मॉस्कोवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. युक्रेनने मास्कोवर 145 ड्रोन टाकले. त्यापैकी रशियाने प्रगत तंत्राचा वापर करून मास्को शहरातून 34 ड्रोन पाडले आणि उर्वरित काही ड्रोन रशियाच्या इतर भागातून पाडण्यात आले. रशियाच्या ड्रोन प्रतिकारक यंत्रणेमुळे त्यांचे कमी नुकसान झाले. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने रशियावर केलेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियानेसुद्धा युक्रेनवर 145 ड्रोनचा वापर करून प्रतिहल्ला केला आणि त्यापैकी 62 ड्रोन युक्रेनने निकामी केल्याचा दावा केला आहे. रशियाने केलेले बहुतेक ड्रोन हल्ले नागरी वस्तीमध्ये करण्यात आले. त्यामुळे त्यांचा हेतू युक्रेनमधील नागरिकांना भयभीत करणे हा होता. याला मनोवैज्ञानिक युद्ध असे म्हटले जाते. या ड्रोन हल्ल्याचे बदललेल्या युद्धतंत्रासंदर्भात भूराजनैतिकदृष्टीने विश्लेषण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
युद्धाचे बदलले तंत्र?- नव्या जगात 21 व्या शतकात युद्धतंत्र कसे बदलत आहे याचे ड्रोन युद्ध हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष सैन्य उतरविण्यापेक्षा ड्रोनद्वारे एखाद्या प्रदेशावर हल्ला करावयाचा व तेथे नुकसान घडवून आणावयाचे असे हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. ठोशास ठोसा या न्यायाने प्रथम युक्रेनने हल्ला केला आणि त्याला रशियाने उत्तर दिले. युक्रेन आणि रशिया यांनी एकमेकांवर केलेले ड्रोन हल्ले आणि त्यातून वाढत असलेले युद्धजन्य वातावरण ही जगाच्यादृष्टीने चिंतेची गोष्ट आहे. कारण रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आजमितीस अडीच वर्षे म्हणजे 903 दिवस झाले आहेत. अजूनही युद्ध थांबायचे नाव घेत नाही. निकोपोल शहरात रशियाने केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले आणि 5 जण जखमी झाले. रशियाच्या बेल्गोरोड शहरात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे एका ठिकाणी मोठी आग लागली. एका महिलेचाही मृत्यू झाला. या युद्धात आजपर्यंत युक्रेनने 80,000 सैन्य गमावले तर 1,20,000 रशियन सैनिक कामास आले आहेत. रशियातील घटती लोकसंख्या पाहता, पुतीन सरकारने लोकसंख्या वाढीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. हा प्रश्न युरोपातील सर्व देशापुढे आहे तसा तो रशियापुढेही निर्माण झाला आहे.
रशियाचेही मोठे नुकसान?- रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनचे जसे नुकसान झाले आहे तसे रशियाचेही नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात दररोज 1500 लोक जखमी झाले किंवा मारले गेले. तसेच त्याचा युद्धखर्च 40 टक्के वाढला आहे. म्हणजे शिक्षण व आरोग्य खात्यावर रशियात जेवढा खर्च होत होता तेवढा खर्च रशिया युद्धावर करीत आहे. असेच युद्ध चालू राहिले तर 2026 मध्ये रशियाची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपिय नाटो राष्ट्रांचे तंत्र असे आहे की, रशियाला युद्धात गुंतवून ठेवावयाचे म्हणजे तो आपोआपच हळूहळू आर्थिकदृष्ट्या दुबळा होऊ लागेल. आता या युरोपिय नाटो राष्ट्रांच्या अवघड तंत्राला क्रेमलिन किती बळी पडते यावर युद्धाचे भवितव्य अवलंबून आहे. युक्रेनने रशियात खोलवर केलेले ड्रोन हल्ले हे रशियाची चिंता वाढविणारे ठरले. खुद्द मास्को शहरावर केलेल्या हल्ल्यामुळे 2 दिवस विमानतळ बंद होते आणि विमानाची उ•ाणे थांबविण्यात आली होती. यावरून रशियातील लोकांनीसुद्धा युक्रेनच्या हल्ल्याची धास्ती व भीती घेतली आहे हे निश्चितपणे म्हणता येईल. जीवित व वित्त हानीचा विचार करता रशिया व युक्रेन दोघांचेही मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमधील शेती बहुश: उद्ध्वस्त झाली आहे. उद्योग व शिक्षण ठप्प झाले आहे. अनेक लोक जीव वाचविण्यासाठी शेजारील देशात निर्वासित म्हणून गेले आहेत. युक्रेनच्या काही औद्योगिक पट्ट्यावर रशियाने ताबा मिळविला आहे. तो भाग रशियाला सोडावयाचा नाही. रशिया युक्रेनच्या ऊर्जा संस्था, उद्योग नगरी यांना लक्ष्य करीत आहे, तर युक्रेन
मॉस्कोसारख्या मानबिंदू शहरावर प्रतिकात्मक हल्ला करून पुतीन यांच्या प्रतिष्ठेला आव्हान देत आहे.
युद्धाचा नवीन टप्पा?- परपस्पराविरुद्धच्या ड्रोन हल्ल्यामुळे युद्धाने आता नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. नवे युद्धतंत्र जगाला पहावयास मिळत आहे. शिवाय, उभय राष्ट्रातील सत्ता संघर्ष अधिक तीव्र होत आहे. रशिया जास्तीत जास्त युक्रेनची भूमी बळकविण्याचा प्रयत्न करीत आहे. युक्रेन रशियाच्या काही भागात पुढे घुसण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हल्ला-प्रतिहल्ला यामुळे ठोशास ठोसा उत्तर देण्याची तयारी होत आहे. उभय देशांच्या सीमेवर सक्रिय युद्धक्षेत्र अधिक व्यापक व संघर्षमय बनले आहे. रशियाला छोटा वाटणारा युक्रेन आता भारी पडत आहे. युक्रेनने खुद्द मॉस्को नगरीवर थेट ड्रोन हल्ले चढविले व मॉस्कोला जेरीस आणले. त्यामुळे युक्रेनचा आत्मविश्वास वाढत आहे. रशियामध्ये अधिक खोलवर हल्ले करूनही झेलेन्स्की म्हणतात की, हा हल्ला अधिक यशस्वी झाला असता. आम्हाला पूर्णपणे लक्ष्य गाठता आले नाही. युद्धक्षेत्र वाढत आहे तशी त्याची तीव्रताही वाढत आहे. दोन्ही बाजूंनी नाट्यामय घडामोडी घडत आहेत. त्यातून परस्पर शह-प्रतिशहाचे राजकारण व्यापक बनत आहे.
तोडगा कसा निघेल?- अडीच वर्षे झाली युद्ध संपता संपत नाही. आता युक्रेन आणि रशियामध्ये तोडगा कोण काढणार? प्रचाराच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठमोठी भाषणे करून आपण निवडून आल्यावर 24 तासात युद्ध थांबवू अशी वल्गना केली होती. असे म्हणतात, की ट्रम्प यांनी पुतीन यांना याबाबत दूरध्वनी केला होता. परंतु रशिया मात्र कानावर हात ठेवून हे केवळ कपोलकल्पित गद्य आहे अशी सावध प्रतिक्रिया देत आहे. या तीन कलमांमध्ये तत्काळ युद्धबंदी, बफर झोनची निर्मिती आणि युरोपियन शांती सेनेची नियुक्ती अशा तरतुदी होत्या. पण ट्रम्प यांच्या अलिकडील काही विधानांमुळे त्यांनी पुन्हा बायडेन प्रशासनाचे धोरण पुढे चालविण्याचे ठरविले आहे की काय? अशी शंका येऊ लागते. त्यामुळे आता हे लांबलेले युद्ध कोण थांबविणार? कसे थांबविणार? यामुळे जगापुढे चिंता उभी राहिली आहे. खुद्द ट्रम्प 17 जानेवारीला सत्ताग्रहण करतील तोपर्यंत त्यांना शांततेची जपमाळ ओढण्यापेक्षा अन्य कोणते अधिकार नाहीत. उलट, बायडेन सिनेटमध्ये युक्रेनला आणखी एक मदतीचा हप्ता देण्यासाठी ठराव आणण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे ट्रम्प यांची कोंडी झाली आहे.
भविष्यकाळात हे युद्ध लांबणे सगळ्या युरोपच्या अर्थव्यवस्थेला जर्जर करणारे ठरू शकेल. पुरवठा साखळी कमजोर झाली, युरोपात ऊर्जा संकट उद्भवले, महागाईने आकाश गाठले तरीही नाटो संघटना युक्रेनच्या समर्थनाचे कागदी घोडे नाचविण्यात भूषण मानत आहे. शिवाय, रशियाची अर्थव्यवस्थाही डबघाईस येईल. युरोपातील जवळजवळ 30-40 राष्ट्रे या युद्धामुळे आर्थिक संकटाच्या दुष्टचक्रात सापडली आहेत. युद्ध थांबले तर तेही सुटकेचा नि:श्वास टाकतील. तेव्हा जीवित आणि वित्त हानी टाळायची असेल, दोन्ही बाजूंनी संघर्षाऐवजी समन्वय किंवा शांतता हे धोरण ठेवायचे असेल तर कुणीतरी तटस्थ व्यक्तीने मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले पाहिजे. यादृष्टीने विचार करता, भारतावर मोठी जबाबदारी आहे असे म्हणावे लागेल. भारताने युक्रेन-रशिया यांच्यातील सुसंवादासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उभे करावे व त्याद्वारे निर्णय घ्यावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही महिन्यांपूर्वी दोघांचीही भेट घेतली व डायलॉग सुरू केला. आता तो पुढे नेण्याची गरज आहे.
- प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर