महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विश्वकप स्पर्धेच्या मध्यंतरास नवखेच संघ हिरो!

06:27 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा आता मध्यंतरास येऊन ठेपली. स्पर्धा सुरू होण्याअगोदर वीस संघ, सामने रटाळ तर होणार नाहीत ना अशा विविध प्रश्नांना पहिल्या पंधरा दिवसातच 2024 च्या टी ट्वेंटी विश्वचषकाने रोखठोक उत्तर दिले. दिग्गज आठ संघ स्पर्धेच्या सुपरएटमध्ये जाणार आणि नवखे संघ फक्त औपचारिकताखातीर या स्पर्धेत भाग घेणार, अशी काहीशी कल्पना सर्व क्रिकेट रसिकांनी केली होती. आणि ती करणं साहजिकच होतं. परंतु बघता बघता नवख्या संघांनी या पूर्ण विश्वचषक स्पर्धेत दादागिरी दाखवली. प्रथितयश समजले जाणारे संघ या स्पर्धेत विजयासाठी अक्षरश: धडपडत होते. पहिल्यापासूनच आपण खेळपट्टीबाबत नाकं मुरडली. परंतु त्यानंतर अमेरिकेत सहभागी होणाऱ्या संघांच्या ते अंगवळणी पडलं. अमेरिका, स्कॉटलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश हे संघ जास्तीत जास्त संघर्ष करतील, मात्र विजयाचा घास काही हिरावून घेणार नाहीत या भ्रमात दिग्गज संघ राहिले. आणि बघता बघता पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड या संघांना खऱ्या अर्थाने पॅकअप करावं लागलं.

Advertisement

मी सुऊवातीपासूनच म्हणत आलोय की पूर्वीचे क्रिकेट आणि आताचे क्रिकेट यामध्ये निश्चित बदल झालाय. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये तंत्र होतं, नजाकतता होती. आजही ती नाही आहे असं म्हणता येणार नाही. परंतु काही गोष्टी या बासनात गुंडाळल्या एवढं मात्र खरं. स्पर्धा सुरू होण्याअगोदर अमेरिका किंवा स्कॉटलंडसारखा संघ सुपर एटमध्ये प्रवेश करेल असं जर कोणी भाकीत केलं असेल तर निश्चित त्याला मुर्खात काढलं गेलं असतं. परंतु पुन्हा एकदा अनिश्चिततेचा खेळ असलेल्या क्रिकेटने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवला. ज्या t20 क्रिकेटमध्ये 190 ते 210 धावा अगदी सहज पार व्हायच्या. तिथे मात्र 110, 120 धावांचा पाठलाग करताना दमछाक होऊ लागली. अर्थात यात पूर्ण दोष खेळपट्टीचाच आहे असे म्हणता येणार नाही. नवख्या संघांनी दाखविलेले कौशल्य, त्यात त्यांना मिळालेल्या नशिबाच्या साथीने मी मी म्हणणाऱ्या संघांचं अक्षरश: कंबरडं मोडलं.

Advertisement

काही दिवसांपूर्वी ज्या अमेरिकेला आपण हिणवत होतो की, तुम्ही फक्त ऑलम्पिकचे राजा, तुमचे क्रिकेटमध्ये काय काम? परंतु त्याच अमेरिकेची या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी निश्चितच कौतुकास्पद किंवा दुर्लक्षित न करणारी. दुसरीकडे डार्क हॉर्स अफगाणिस्तान संघाबद्दल काय बोलावं. भल्या भल्या संघांची त्यांच्यासमोर त्यांच्या पायाखालची वाळू घसरू पाहतेय. त्यांचा स्पिनर्सचा बोलबाला अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यातच भर की काय, काल दक्षिण आफ्रिका मानहानिकारक पराभवातून वाचला. नेपाळने तर अक्षरश: त्यांच्या तोंडाला फेस आणला होता. नशीब बलवत्तर म्हणून आफ्रिका संघ सहीसलामत सुटला. एकंदरीत काय सिनेमास्कोपरुपी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत खेळ हा मध्यंतरास थांबलाय. पूर्वार्धात नवख्या संघांनी बाजी मारली आहे. नवखे संघ शेवटपर्यंत टिकून ठेवतात की त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सुपर एटमध्ये कोसळतो हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. थोडक्यात काय तर या स्पर्धेने कुठल्याच नवख्या संघाला कमी लेखू नका हाच संदेश दिला आहे. दुसऱ्या बाजूने या स्पर्धेने क्रिकेटचा आवाका वाढतोय. चांगले गुणवत्ताधारक असलेले काही खेळाडू नवोदित देशांना मिळाले तर मात्र लिंबू टिंबू संघांना क्रिकेटमध्ये गृहीत धरणं हे मात्र बंद होऊन जाईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article