For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

06:58 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांचा आफ्रिकेवर दणदणीत विजय
Advertisement

पुरुषांपाठोपाठ महिलांचाही  धमाका : एकमेव कसोटीत आफ्रिकेवर 10 गडी राखून मात : सामनावीर स्नेह राणाचे 10 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

सलामीवीर शेफाली वर्माचे दमदार द्विशतक, स्मृती मानधनाची शतकी खेळी व स्नेह राणाची अप्रतिम गोलंदाजी या जोरावर भारतीय महिला संघाने एकमेव कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघावर 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने एकमेव कसोटी मालिकाही जिंकली. विशेष म्हणजे, वनडे मालिकेत 3-0  असा क्लीन स्वीप दिल्यानंतर कसोटी मालिका जिंकत भारतीय महिला संघाने आफ्रिकेला चांगलाच दणका दिला आहे. सामन्यात 10 बळी घेणाऱ्या स्नेह राणाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, उभय संघात तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 5 जुलैपासून या मालिकेला प्रारंभ होईल.

Advertisement

चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 603 धावा करून डाव घोषित केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 266 धावांवरच मर्यादित राहिला, त्यामुळे त्यांना फॉलोऑनला सामोरे जावे लागले. यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 373 धावा केल्या व भारताला केवळ 37 धावांचे लक्ष्य मिळाले. हे विजयासाठी लक्ष्य भारतीय महिला संघाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले आणि सामना दहा गडी राखून जिंकला.

स्नेह राणाचे दहा बळी

सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकन संघाने 2 बाद 232 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलव्हर्ट (314 चेंडूत 122) आणि सुने लुस (203 चेंडूत 109) या दोघींनी शानदार शतके झळकावली. दिवसाच्या सुरुवातीला मरिजेन केपच्या रुपाने आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. तिला दीप्ती शर्माने बाद केले. मारिजेन केपने 82 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. नादिन डी क्लर्कने 182 चेंडूंचा सामना करत नाबाद 61 धावा केल्या. शतकवीर वुलव्हर्ट बाद झाल्यानंतर इतर आफ्रिकन फलंदाज सपशेल अपयशी ठरल्या. तळाच्या आफ्रिकन महिला फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. आफ्रिकेचा दुसरा डाव 154.4 षटकांत 373 धावांवर आटोपला व टीम इंडियाला विजयासाठी अवघे 37 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून दुसऱ्या डावात स्नेह राणा, दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन विकेटस घेतल्या. तर पूजा वस्त्राकार, हरमनप्रीत व शेफाली यांना एक-एक विकेट मिळाली. दरम्यान, स्नेह राणाने संपूर्ण सामन्यात 10 बळी घेतले, तिलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

टीम इंडियाचा सहज विजय

दुसऱ्या डावात विजयासाठी अवघे 37 धावांचे मिळालेले लक्ष्य भारतीय महिला संघाने 9.2 षटकात पार केले. शेफाली वर्माने 30 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह नाबाद 24 धावा फटकावल्या. शुभा सतीशने नाबाद 13 धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला संघ पहिला डाव 6 बाद 603 घोषित व दुसरा डाव 9.2 षटकांत बिनबाद 37 (शुभा सतिश नाबाद 13, शेफाली वर्मा नाबाद 24)

दक्षिण आफ्रिका पहिला डाव सर्वबाद 266 व दुसरा डाव 154.4 षटकांत सर्वबाद 373 (लॉरा वुलव्हर्ट 122, सुने लुस 109, डी क्लर्क 61, मरिजेन केप 31, स्नेह राणा, दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड प्रत्येकी दोन बळी).

 भारतीय महिलांची विक्रमी धावसंख्या अन् वर्ल्डरेकॉर्ड

चेन्नईत भारतीय महिला संघ व दक्षिण आफ्रिका यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव 6 बाद 603 धावांवर घोषित केला. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, एका संघाने एका डावात 600 धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाच्या नावावर होता, ज्यांनी 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ येथे झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 575 धावा केल्या होत्या. 600 धावांच्या मोठ्या धावसंख्येसह भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वविक्रम केला. महिला क्रिकेट सुरु झाल्यापासून 90 वर्षाच्या कालखंडात प्रथमच एका संघाने 600 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एका डावातील सर्वोच्च धावसंख्या

भारत  603 धावा (वि द. आफ्रिका, 2024)

ऑस्ट्रेलिया  575 धावा (वि द. आफ्रिका, 2023)

ऑस्ट्रेलिया  569 धावा (वि. इंग्लंड, 1998)

Advertisement
Tags :

.