For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दांडेली शहरातील नवीन टीसी कुचकामी

10:03 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
दांडेली शहरातील नवीन टीसी कुचकामी
Advertisement

पाणी-वीजपुरवठ्याअभावी नागरिकांची गैरसोय : गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी

Advertisement

दांडेली : राज्य सरकारच्या नगरोत्थान अनुदानाअंतर्गत दांडेली शहरात पाणीपुरवठा व विद्युत पुरवठ्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. पण कामे निकृष्ट झाल्याने त्याचा लाभ दांडेली जनतेला होत नाही. कामे निकृष्ट झाली असून, साहित्यही इतरत्र पडून आहे. याकडे राज्य सरकारच्या नगरोत्थान विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरपणे लक्ष द्यावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसदस्य डी. सॅमसन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. नगरोत्थान अनुदानांतर्गत दांडेली शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन व विद्युत पुरवठ्यासाठी अंतर्गत नवीन टीसी बसविण्यात आल्या आहेत. सदर काम निकृष्ट झाल्याने सर्व साहित्यही तेथेच पडून आहे. मारुतीनगरमध्ये वाटर टँकजवळ दोन नवीन टीसी बसविण्यात आले आहेत. या टीसी दर्जेदार नसल्याने दिवसातून पाच-सहावेळा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. जनतेच्या तक्रारी वाढल्याने जुन्या टीसीद्वारेच विद्युतपुरवठा सध्या होत आहे. नवीन टीसी कुचकामी ठरली आहे. जुन्याच लाईनद्वारे विद्युतपुरवठा करायचे होता तर नवीन लाईन व दोन-दोन टीसीसाठी लाखो रुपये का खर्च केले? असा प्रश्न जनता दांडेली प्रशासनास करत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

पटेलनगर येथे जॅकवेल व पंप हाऊस आहे. येथूनच संपूर्ण दांडेली शहरास पाणी पुरवठा होतो. पाणी फिल्टर व्यवस्थित होत नसल्याने येथेही लाखो रुपये खर्च करून फिल्टर मशीन बसविली आहे. हे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले पण, मशीन अजून चालू करण्यात आली नाही. पाण्याच्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू व इतर कचरा पडला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या दोन्ही प्रकरणात लाखो रुपये खर्च झाले आहेत. पण याचा लाभ जनतेला म्हणावा तसा झाला नाही. नगरोत्थान निधीचा अधिकारी वर्गाकडून दुरूपयोग झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याकडे कारवार जिल्हाधिकारी यानी लक्ष द्यावे अशी मागणी माजी नगरसदस्य डी. सॅमसन यांनी केली आहे.

नगरसदस्य डी. सॅमसन

Advertisement
Advertisement
Tags :

.