एकाच कुटुंबातील सहा जणांना जलसमाधी; काळी नदीच्या पात्रामध्ये दुर्घटना
: मृत हुबळीचे रहिवासी
वार्ताहर /दांडेली
हुबळीच्या ईश्वरनगर येथील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींचा अकोर्डा गावाजवळच्या काळी नदीच्या पात्रामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 2 वाजता घडली आहे. या घटनेची नोंद दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हुबळी येथील ईश्वरनगरचे रहिवासी नजीर अहमद (वय 40), अलच्छीया अहमद (वय 10), मोहीन अहमद (वय 6), रेश्मा उन्नीसा (वय 38), इफ्रान अहमद (वय 15), अबीद अहमद (वय 12) यांचा अकोर्डा गावाजवळच्या नदीच्या पात्रामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. अलच्छीया अहमद व मोहिन अहमद पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याचा भाऊ इफ्रान अहमद व अबीद अहमद त्यांना वाचविण्यासाठी गेले. त्यावेळी तेही बुडत असल्याचे पाहून त्यांचे वडील नजीर अहमद व पत्नी रेश्मा उन्नीसा यांनी सुद्धा पाण्यात उडी टाकली. त्यावेळी हे दोघे पती व पत्नी सुद्धा पाण्यात बुडाले. यांच्याबरोबर असलेले दोघे व्यक्ती पाण्यात न उतरल्याने ते वाचले आहेत. या घटनेची माहिती पोलीस व वन विभागास माहिती होताच दोन्ही विभागाचे अधिकारी उपस्थित राहून गावकऱ्यांच्या व रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने या सर्व सहा जणांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय व स्टाफ यांनी सर्व मृतदेहांचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी दांडेली दवाखान्याकडे पाठविण्यात आले आहेत.