नव्या आत्मघाती ड्रोनची निर्मिती होणार
900 किमी असणार रेंज : स्वदेशी तंत्रज्ञानाचा असणार अंतर्भाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत स्वत:च्या सैन्यशक्तीला मजबूत करण्यासाठी एका नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. देश आता 900 किलोमीटरपेक्षा अधिक उ•ाण कक्षा असलेल्या सुसाइड ड्रोन विकसित करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. हा ड्रोन शत्रूच्या तळांवर हल्ला करण्यासह यात विस्फोटके लोड करत त्याला एका अस्त्राच्या स्वरुपातही वापरला जाऊ शकतो. या ड्रोन प्रकल्पात नागपूरची सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड सर्वात आघाडीवर आहे. या कंपनीला पिनाका रॉकेट सिस्टीम तयार करणारी कंपनी म्हणून ओळखले जाते.
सुसाइड ड्रोन हे एकप्रकारचे मानवरहित हवाईयान आहे, जे स्वत:च्या लक्ष्यावर हल्ला केल्यावर स्वत:ही नष्ट होते. याला लॉयरिंग म्युनिशन देखील म्हटले जते. कारण हे आकाशात दीर्घकाळात घोंगावत राहून योग्यवेळी हल्ला करते. यात विस्फोटके भरलेली असतात.
हा नवा ड्रोन शत्रूचे तळ, रणगाडे सुरक्षा प्रणालींना नष्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. भारताचा नवा ड्रोन 900 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत जात शत्रूचा वेध घेऊ शकतो. या ड्रोनमुळे क्षेत्रीय शक्तीच्या स्वरुपात भारताची स्थिती अधिक मजबूत होणार आहे. हा ड्रोन लवकरच भारतीय सैन्याचा हिस्सा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या ड्रोन प्रकल्पासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च-नॅशनल लेबोरेट्रीजने अनेक कंपन्यांकडून तांत्रिक आणि वाणिज्यिक निविदा मागविल्या होत्या.
प्रकल्पाचा उद्देश अन् प्रगती
हा ड्रोन 150 किलोग्रॅम श्रेणीचे लॉयरिंग म्युनिशन असून ज्याला संशोधन, विकास, निर्मिती आणि वाणिज्यिक वापरासाठी डिझाइन करण्यात येणार आहे. याची रेंज 900 किलोमीटरपेक्षा अधिक असेल, या रेंजमुळे भारताच्या शेजारी देशांच्या विरोधात संरक्षण रणनीतित हे एक शक्तिशाली शस्त्र ठरणार आहे. हा ड्रोन भारताला सीमापार हल्ल्यांकरता मदत करणार असून खासकरून चीन आणि पाकिस्तान विरोधातील मोहिमेत हा उपयुक्त ठरणार आहे. हा प्रकल्प भारताच्या आत्मनिर्भरतेला चालना देणारा असून आयातीवरील निर्भरता कमी करणार आहे. हा ड्रोन शत्रूचे तळ नष्ट करणे आणि युद्धभूमीमध्ये नियंत्रण राखण्यास मदत करणार आहे. या ड्रोनची भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होऊ शकते, यामुळे भारताला आर्थिक लाभ होऊ शकतो.