नव्या मोसमापासून आयपीएल कार्यकारी मंडळाचे नवे नियम,
सामना खेळणाऱ्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी 7.5 लाख, आता 6 खेळाडू रिटेन करण्याची मुभा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयपीएल कार्यकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, 10 आयपीएल संघांना त्यांच्या मागील संघातील जास्तीत जास्त सहा खेळाडू लिलावावेळी राखून ठेवण्याची परवानगी दिली जाईल आणि यात ‘राईट टू मॅच’ही समाविष्ट राहील. संघांना खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी पदरमोड करण्याची मर्यादा 120 कोटी ऊपयांवर नेण्यात आली असून त्यातील 75 कोटी रु. खेळाडू राखून ठेवण्यावर खर्च होतील.
बीसीसीआयने असे देखील ठरवले की, जो भारतीय खेळाडू किमान पाच कॅलेंडर वर्षे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही त्याला ‘अनकॅप्ड खेळाडू’ मानले जाईल. यामुळे चेन्नई सुपर किंग्ज महेंद्रसिंह धोनीला आरामात राखून ठेवू शकेल. धोनी देशासाठी शेवटचा सामना 2019 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ‘अनकॅप्ड’ खेळाडूला राखून ठेवण्याची किंमत 4 कोटी ऊपये असेल आणि त्यामुळे सीएसकेने धोनीला कायम ठेवले, तरी लिलावावेळी खर्च करण्याच्या दृष्टीने नक्कीच खूप बचत होऊ शकते.
2022 मध्ये झालेल्या शेवटच्या मेगा लिलावात एका संघाला चारपर्यंत खेळाडू राखून ठेवण्याची परवानगी होती. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी लीग सामने खेळण्यासाठी निवडलेल्या सर्व खेळाडूंना 7.50 लाख ऊपयांची निश्चित मॅच फी जाहीर केली आहे. यामुळे वेतनावर 1.05 कोटी रु. अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होईल. संघांना पुढील हंगामासाठी लिलावावेळी खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी व राखून ठेवण्यासाठी 120 कोटी ऊपयांच्या निधीच्या जेडीला 12.60 कोटी रुपयांचा वेतनासाठीचा निधीही काढून ठेवावा लागेल.
एकूण वेतनामध्ये आता लिलावावेळी करारबद्ध करण्यासाठी मोजलेली किंमत, कामगिरीनुसार वाढीव वेतन आणि सामना शुल्क यांचा समावेश असेल. 2024 मध्ये एकूण वेतन निधी लिलावावेळी मोजलेली किंमत व कामगिरीनुसार वाढीव वेतन मिळून ऊ. 110 कोटी असा ठरविण्यात आला होता. तो आता ऊ. 146 कोटी (2025), ऊ. 151 कोटी (2026) आणि ऊ. 157 कोटी (2027) असा राहील, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
आयपीएल संघ आता त्यांच्या विद्यमान संघातील 6 खेळाडूंना राखून ठेवू शकतात किंवा त्यासाठी आरटीएम पर्याय वापरू शकतात. अशा 6 खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त 5 ‘कॅप्ड’ खेळाडू (भारतीय आणि परदेशी) आणि जास्तीत जास्त 2 ‘अनकॅप्ड’ खेळाडू असू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पहिल्या रिटेंशनसाठी (राखून ठेवलेला खेळाडू) ऊ. 18 कोटी, त्यानंतर ऊ. 14 कोटी आणि तिसऱ्यासाठी 11 कोटी ऊ. मोजावे लागतील. तथापि, जर संघाने चौथ्या आणि पाचव्या ‘रिटेंशन’साठी निवड केली, तर त्यांना पुन्हा अनुक्रमे 18 कोटी आणि 14 कोटी ऊपये द्यावे लागतील.
असे समजते की मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यासारखे बलाढ्या संघ सहा ते आठ खेळाडू राखून ठेवण्याच्या तरतुदीच्या बाजूने होते. ज्यांच्याकडे जास्त स्टार पॉवर नाही असे इतर काही संघ त्याच्या विरोधात होते.
दरम्यान, काही इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी लिलावावेळी निवडल्यानंतरही अनेकदा थकवा आणि इतर प्राधान्यक्रमांचा हवाला देऊन संघांतून खेळणे टाळलेले आहे. आता लिलावात निवड झाल्यानंतर माघार घेणाऱ्या कोणत्याही खेळाडूवर 2 वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे.