केदारनाथसाठी नवा मार्ग उपलब्ध
2 किलोमीटरने कमी होणार अंतर : प्रवास तुलनेत सोपा ठरणार
वृत्तसंस्था/ केदारनाथ
केदारनाथ धामसाठी सोनप्रयाग-गौरीकुंड व्यतिरिक्त नवा मार्ग शोधण्यात आला आहे. हा मार्ग चौमासी गावात असून तो गुप्तकाशीपासून कालीमठ आणि तेथून 25 किलोमीटर अंतरावर 2100 मीटरच्या उंचीवर आहे. चौमासी ते केदारनाथ मंदिराचे अंतर 19 किलोमीटर आहे. हे सोनप्रयागपासून मंदिरापर्यंतच्या 21 किलोमीटर अंतराच्या मार्गापेक्षा 2 किलोमीटरने कमी आहे.
31 जुलै रोजी केदारनाथच्या 6 किलोमीटर आधी भीमबलीमध्ये ढगफुटी झाल्याने 15 हजार लोक अडकून पडले होते. 7 दिवसांनी या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे शक्य झाले होते. या आपत्तीतून धडा घेत रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने मंदिरासाठी पर्यायी मार्गाच्या शोधाकरता एका रेकी पथकाला शुक्रवारी चौमासी येथून रवाना केले होते. हे पथक आता परतले असून त्याने अद्याप स्वत:चा अहवाल प्रशासनाला सादर केलेला नाही. परंतु पथकाचे नेतृत्व करणाऱ्या तज्ञाने चौमासी मार्गावर भूस्खलनाचा धोका नसून तेथे पर्वतीय ओढे नसल्याचे सांगितले आहे.
नव्या मार्गावर गवताळ मैदान अधिक
मार्गाचा मोठा हिस्सा खास बुग्याल म्हणजेच पर्वतीय भागातील गवताळ मैदानांमधून जातो. तर वर्तमान मार्ग 10-12 हजार फुटांच्या उंचीवर आहे. तर नव्या मार्गाची उंची 6-9 हजार फुटांदरम्यान आहे. या मार्गावर चढाव कमी असून तो वन्यजीव अभयारण्यातून जातो. तेथे कुठल्याही स्थितीत हेलिकॉप्टर सेवा सुरू ठेवता येणार आहे.
चौमासीचा मार्ग सोपा
2013 मध्ये केदारनाथ धाम येथे आपत्ती आली असता बचाव पथक चौमासी येथूनच केदारनाथपर्यंत पोहोचले होते. हा मार्ग 6 फूट रुंदीचा आहे. परंतु तो विकसित करावा लागणार आहे. चौमासीपासून 5 किलोमीटर अंतरापुढील मार्ग काली गाड नदीच्या काठावर आहे. त्यानंतर गवताळ मैदानी भाग सुरू होतो, त्यापुढे कुठेही नाला किंवा नदी नाही. याचमुळे हा मार्ग थकविणारा ठरणार नाही.
हेलिकॉप्टर सेवा सुरू
केदारनाथ धामसाठी 7 जुलैपासून हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. भाविक हेलिकॉप्टरद्वारे तेथे पोहोचून बाबा केदारचे दर्शन घेऊ शकतात. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निर्देशानुसार सिरसी, गौरीकुंड आणि फाटा येथून हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर तिकिटात देखील भाविकांसाठी 25 टक्के सूट दिली जाणार आहे.