बेंगळूरऐवजी नव्या मुंबईची निवड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या महिलांच्या आयसीसी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सामन्यांच्या पाच ठिकाणांपैकी एका ठिकाणात बदल करण्यात आला आहे. बेंगळूर ऐवजी नव्या मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सामने खेळविले जाणार आहेत.
30 सप्टेंबरपासून महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. नव्या मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये या स्पर्धेतील एकूण पाच सामने खेळविले जाणार आहेत. त्यामध्ये साखळी फेरीतील तीन, उपांत्य फेरीचा आणि अंतिम फेरीचा सामन्यांचे आयोजन या अद्यावत स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आरसीबीने जेतेपद मिळविल्यानंतर बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केलेल्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही जणांना आपले जीव गमवावे लागले. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आगामी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने खेळविता येणार नाहीत. त्यामुळे आता हे सामने नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळविले जातील.
आयसीसीच्या महिलांच्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने भरविली जात आहे. स्पर्धेतील सामने गुवाहाटी, इंदौर, विशाखापट्टनम आणि कोलंबो येथे खेळविले जाणार आहेत.