For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकातील पावसाळी हंगामातील नवीन कांद्याची आवक सुरू

06:45 AM Sep 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकातील पावसाळी हंगामातील नवीन कांद्याची आवक सुरू
Advertisement

महाराष्ट्र जुना कांद्याचा दर शंभर रुपयांनी वाढला : रताळी, बटाटा दर स्थिर

Advertisement

सुधीर गडकरी/  अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र जुना कांद्याचा दर प्रतिक्विंटलला शंभर रुपयांनी वाढला आहे. तर कर्नाटकातील पावसाळी हंगामातील नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून या कांद्याचा दर्जा खालावला आहे. हा कांदा कच्चा आहे. त्यामुळे खराब कांदा मार्केट यार्डमध्ये येत असून त्याचा भाव क्विंटलला केवळ 500 पासून ते 1200 पर्यंत झाला आहे. रताळी दर टिकून आहे. इंदोर बटाटा दर, आग्रा बटाटा, हासन बटाटा व जवारी बटाटा दर स्थिर आहेत. नवीन पांढरा कांदा दरदेखील खराब येत असल्याने त्यालासुद्धा मागणी नाही. भाजीमार्केटमध्ये अल्ले दरात वाढ झाली आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर टिकून आहेत.

Advertisement

एपीएमसीमध्ये शनिवारच्या बाजारात जुना महाराष्ट्र कांद्याच्या 45 व कर्नाटक जुन्या कांद्याच्या 8 ट्रका, कर्नाटक नवीन कांद्याच्या 15 ट्रका, पांढऱ्या कांद्याच्या साठ पिशव्या आवक, इंदोर बटाट्याच्या 12 ट्रका, हासन बटाट्याच्या 15 ट्रक, आग्रा बटाट्याच्या 3 ट्रका आवक विक्रीसाठी दाखल झाली होती. यामध्ये महाराष्ट्र जुना कांदा दर क्विंटलला 1500 पासून 2200 रुपये, कर्नाटक कांदा नवीन दर क्विंटलला 400 पासून 1200 रुपये, जुना कर्नाटक कांदा दर 1000 पासून 1800 रुपये, पांढरा कांदा दर 500 पासून 3000 हजार रुपये, इंदोर बटाटा दर 1800 पासून 2200 रुपये, हासन बटाटा दर 500 पासून 1800 रुपये, आग्रा बटाटा दर 1200 पासून 1600 रुपये भाव झाला आहे, अशी वरील संपूर्ण माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी दिली.

सध्या तालुक्यातील भुतरामट्टी, वंटमुरी परिसरातील मसार जमिनीतील बटाटा मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आला आहे. हा बटाटा उत्तर प्रदेश, गोवा, कोकणपट्टा, बेळगाव परिसरामध्ये निर्यात होत आहे. शनिवारी बाजारात सुमारे 4000 पिशव्यांची आवक विक्रीसाठी दाखल झाली होती व याचा भाव 500 पासून 1800 रुपये झाला व रताळ्याची सुमारे 5000 पिशव्यांची आवक विक्रीसाठी आली आहे. याचा भाव 1300 पासून 2000 रुपये झाला आहे. ही रताळी परराज्यामध्ये मागणीनुसार निर्यात करण्यात येत आहेत व सध्या जवारी बटाटा व रताळी यांचा दर टिकून आहे. तसेच आवकदेखील दिवसेंदिवस वाढत आहे, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.

हलक्या दर्जाच्या कर्नाटक कांद्याची आवक

पावसाळी हंगामातील नवीन कांदा काढणीला सुरुवात होऊन सुमारे वीस दिवस झाले आहेत. अति पावसामुळे कांदा लागवडीच्या शेतामध्ये पाणी तुंबून राहिल्याने पन्नास टक्के कांदा शेतामध्येच खराब झाला आहे. त्यामधीलच उर्वरित कांदा वेधून शेतकरी मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. मात्र तो कांदा लगेच दोन-चार दिवसांमध्ये खराब होत आहे. त्यामुळे नवीन कांदा खरेदी केलेल्या

व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तर परराज्यामध्ये निर्यात केलेल्या व्यापाऱ्यांचे एका तर ट्रकमागे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्यात करणारे खरेदीदार गप्प आहेत. त्यामुळे या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. क्विंटलला 200 पासून 1200 रुपये दर होत आहे, अशी माहिती एका अडत व्यापाऱ्याने ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

जुना महाराष्ट्र कांदा दरात शंभर रुपयांनी वाढ

गेल्या महिन्याभरापासून कांदा दर टिकून होता. क्विंटलला 1500 ते 2000 किंवा 2100 रुपये दर होत होता. मात्र शनिवारी महाराष्ट्र जुन्या कांद्याच्या आवकेत थोड्या प्रमाणात घट झाली तर दुसरीकडे कर्नाटक नवीन कांदा हलक्या दर्जाचा आल्याने खरेदीदार महाराष्ट्र कांद्याकडे वळले. यामुळे महाराष्ट्र जुना कांदा दरात शंभर रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापाऱ्याने दिले.

जवारी बटाटा, रताळी आवकेत तालुक्यातील पावसाळी हंगामातील जवारी बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मसार मातीच्या जमिनीतील बटाटा काढण्यात येतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये लाल जमिनीतील बटाटा काढण्यात येतो. त्यानंतर पाऊस कमी होऊन कडक ऊन पडते व काळ्या जमिनी सुकतात. त्यावेळी तिसऱ्या टप्प्यातील बटाटा काढणीला प्रारंभ होतो. हंगामानुसार रताळी काढणीसुद्धा वेगाने सुरू आहे. त्यामुळे रताळ्याची आवकदेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही रताळी मागणीनुसार परराज्यामध्ये निर्यात होतात. जवारी बटाटा देखील निर्यात होतो, अशी माहिती जवारी बटाटा व रताळी व्यापाऱ्याने दिली.

भाजीमार्केटमध्ये अल्ले दरात किंचित प्रमाणात वाढ झाली आहे. शेवगा दरात देखील वाढ झाली आहे. तर कच्च्या भाजीपाल्यांच्या दरात स्थिरता टिकून आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो, कोथिंबीर, बीट, बीन्स, वांगी, गाजर, भेंडी, कांदापात, पुदिना, लाल भाजी, मेथी, शेपू, काकडी, बेळगाव फ्लॉवर, नवलकोल, मुळा बंडल, मिरची, गवार, दोडके यांचा भाव टिकून आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.