फ्रान्समध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन
मोदींसह मॅक्रॉन यांची उपस्थिती : मार्सिले शहर भारतासाठी महत्त्वाचे केंद्र
वृत्तसंस्था/ पॅरिस, मार्सिले
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या फ्रान्स दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी फ्रान्समधील मार्सिले शहरात भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारी रोजी पॅरिस, फ्रान्स येथे पोहोचले होते. याचदरम्यान बुधवारी फ्रान्समधील मार्सिले येथे पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले. तसेच येथे उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेत संवादही साधला.
भारताने फ्रान्समध्ये दुसरे वाणिज्य दूतावास उघडले. भारताच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे. भूमध्य सागरी किनाऱ्यावरील धोरणात्मक स्थानामुळे मार्सिले हे भारत आणि फ्रान्समधील व्यापाराचे एक प्रमुख प्रवेशद्वार बनणार आहे. तसेच ते भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरच्या (आयएमईसी) प्रवेश बिंदूंपैकी एक आहे. 2023 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेत ‘आयएमईसी’ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती.
द्विपक्षीय चर्चेनंतर अमेरिकेला रवाना
पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्याचा बुधवार हा तिसरा दिवस होता. मंगळवारी रात्री ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मार्सिले येथे पोहोचले. महायुद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोदींनी मजारग्यूज युद्ध स्मशानभूमीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांसोबत मार्सिले येथील वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली. द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले.
वीर सावरकर यांचे स्मरण
मार्सिले येथे पोहोचल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांचे स्मरण केले. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, भारताच्या स्वातंत्र्यात या शहराचे विशेष महत्त्व आहे. खरंतर, सावरकरांना 1910 मध्ये नाशिक कट प्रकरणात लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना जहाजाने भारतात आणले जात होते. जेव्हा त्यांचे जहाज मार्सिलेला पोहोचले तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि पोहत किनाऱ्यावर पोहोचले. त्यांना पुन्हा मार्सिले येथे ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. फ्रेंच सरकारने आपल्या भूमीतील सावरकरांच्या अटकेचा विरोध केल्यानंतर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले होते.