चीनमधील नवीन होंगकी पूल कोसळला
► वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या सिचुआन प्रांतात नुकताच उद्घाटन झालेला होंगकी पूल अंशत: कोसळला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 758 मीटर लांबीचा हा पूल बांधण्यात आला होता. उद्घटनानंतर केवळ 44 दिवसात तो कोसळल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हा पूल 28 सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर पुलाच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरकड्या आणि रस्त्यांवर भेगा निदर्शनास येत होत्या. डोंगराचा कडा घसरू लागल्यावर सोमवारपासून अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ पूल बंद केला होता. मंगळवारी दुपारी परिस्थिती आणखी बिकट झाली. डोंगरकड्यावरून मोठ्या प्रमाणात माती घसरल्यामुळे पुलाचा एक भाग कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे आणि पुलाचे खांब खडकांवर आणि खाली असलेल्या नदीत कोसळत असल्याचे दिसून येत आहे. हा पूल दरीच्या तळापासून सुमारे 625 मीटर उंचीवर असल्याचे वृत्त आहे.