पॅरा तिरंदाज शीतल देवीचा नवा ‘इतिहास’
राष्ट्रीय सक्षम संघात स्थान, निवडचाचणीत मिळविला तिसरा क्रमांक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
महिला पॅरा तिरंदाज शीतल देवीने आणखी एक अडथळा पार करून राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याचा पराक्रम केला. जेद्दाह येथे होणाऱ्या आशिया चषक स्टेज 3 स्पर्धेसाठी सक्षम खेळाडूंचा समावेश असलेल्या कनिष्ठ तिरंदाजी संघात तिची निवड करण्यात आली आहे. ती पॅरा वर्ल्ड कंपाऊंड चॅम्पियन आहे. दोन्ही हात नसल्याने ती पायाने तिरंदाजी करते. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सक्षम खेळाडूंच्या संघात स्थान मिळविणारी पहिली पॅराअॅथलीट असलेल्या शीतलने नवा इतिहास घडविला आहे. 2024 पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत मिश्र सांघिक कंपाऊंड प्रकारात कांस्य मिळविणाऱ्या शीतलने तुर्कीचा पॅराऑलिम्पिक
चॅम्पियन ओझनुर क्युअर गिर्दीपासून प्रेरणा घेतली असून ओझनुर सक्षम खेळाडूंच्या जागतिक स्पर्धांत सहभागी होतो. ‘तिरंदाजी सुरू केल्यापासून सक्षम खेळाडूंच्या संघातून खेळण्याचे स्वप्न मी पहिले होते. त्यासाठी मी अनेकदा प्रयत्नही केले. पण त्यात यश आले नाही. मात्र प्रयत्न करणे सोडले नव्हते. प्रत्येक वेळी चुकातून शिकत गेले आणि आज ते स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे,’ अशा भावना शीतलने सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
देशभरातील 60 हून अधिक सक्षम तिरंदाजांनी निवड चाचणीत भाग घेतला होता. त्यात जम्मू-काश्मीरच्या 18 वर्षीय शीतलचाही समावेश होता. सोनीपत येथे झालेल्या या चार दिवसांच्या राष्ट्रीय निवड चाचणीत तिने तिसरे स्थान पटकावले. शीतलने पात्रता फेरीत 703 गुण मिळवले, पहिल्यामध्ये 352 आणि दुसऱ्यामध्ये 351 जे पात्रता फेरीतील अव्वल स्थान मिळविणाऱ्या तेजल साळवेच्या एकूण गुणांइतकेच होते. अंतिम क्रमवारीत, तेजल (15.75 गुण) व वैदेही जाधव (15 गुण) यांनी अव्वल दोन स्थाने पटकावली, तर शीतलने 11.75 गुणांसह तिसरे स्थान मिळवताना महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वरी गडधेला 0.25 गुणांनी मागे टाकले.
भारतीय संघ
- रिकर्व्ह पुरुष : रामपाल चौधरी (एएआय), रोहित कुमार (उत्तर प्रदेश), मयंक कुमार (हरियाणा);
- महिला : कोंडापावुलुरी युक्ता श्री (आंध्र प्रदेश), वैष्णवी कुलकर्णी (महाराष्ट्र), क्रातिका बिचपुरिया (मध्य प्रदेश).
- कंपाउंड पुरुष : प्रद्युमन यादव, वासू यादव, देवांश सिंग (सर्व राजस्थान);
- महिला : तेजल साळवे, वैदेही जाधव (दोन्ही महाराष्ट्र), शीतल देवी (जम्मू-काश्मीर).