नवा जीएसटी जनतेचे जीवनमान सुधारण्यास अनुकूल
खासदार जगदीश शेट्टर यांची प्रतिक्रिया
बेळगाव : 2017 मध्ये सुरु झालेल्या ‘एक राष्ट्र-एक कर’ धोरणाने नवा इतिहास निर्माण केला. देशाला आर्थिक चैतन्य देऊन जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे आर्थिक राष्ट्र बनण्यास वस्तू व सेवाकराने (जीएसटी) महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता नवा जीएसटी सुरु झाल्याने देशातील जनतेचे जीवनमान सुधारण्याबरोबरच बचत व आर्थिकदृष्ट्या बळ मिळण्यास अनुकूल झाले असल्याची प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यापासूनच देशातील जनतेच्या हितासाठी कार्य केलेले आहे.
गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी काही योजना हाती घेतल्या आहेत. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन यासारख्या योजना सुरु केल्या. आता नवा जीएसटी लागू झाल्याने दूध, फळफळावळे, भाजीपाला, गहूपीठ, खाद्यतेल, साखर, खाद्यपदार्थ यासारख्या वस्तूंचे व धान्यांचा कर शून्य होणार आहे. 33 जीवरक्षक औषधांना शून्य कर लागू होणार असून यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांची सोय होणार आहे. कृषी क्षेत्रातील विकासाला महत्त्व देऊन सौर पंपसेट, सोलार विद्युत योजनेसाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये 5 टक्के दर कपात केली आहे. नवउद्योजक, वस्त्रोद्योग, कृषी, इलेक्ट्रॉनिक्स, शिक्षण, वैद्यकीय, ऑटोमोबाईल यासारख्या अनेक क्षेत्रात रोजगार निर्मिती होणे शक्य होणार असल्याचे खासदार शेट्टर यांनी म्हटले आहे.