तासगावात नवीन हिरवा बेदाण्यास 651 दर
तासगाव :
तासगाव बेदाणा बाजारपेठेत शनिवारी झालेल्या बेदाणा सौद्यात यावर्षीच्या नवीन हिरवा बेदाण्यास 651 रूपये असा उच्चांकी दर मिळाला. पश्चिम महाराष्ट्रात आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक दर असून या ऐतिहासिक उच्चांकी दरांचा बहुमान मे. धारेश्वर टेडींग कंपनी या अडत दुकानाने मिळवला आहे. तासगांवात बेदाण्यास अपेक्षित व उच्चांकी दर मिळत आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी तासगांव बेदाणा बाजारपेठेत बेदाणा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती युवराजदादा पाटील यांनी केले आहे.
बाजार समिती आवारातील बेदाणा सेल हॉल येथे शनिवारी 35 अडत दुकानामध्ये बेदाणा शेतीमालाचे सौदे झाले. यावेळी भूपाल पाटील यांच्या मे. धारेश्वर ट्रेडींग कंपनी या अडत दुकानात शेतकरी नागाप्पा शरणाप्पा हाडगे रा. बेळुडगी, ता. जत यांनी 23 बॉक्स नवीन हिरवा बेदाणा विक्रीसाठी ठेवला होता या बेदाण्यास 651 रूपये असा दर मिळाला. हा बेदाणा मे. हिंगमिरे ट्रेडींग कंपनीचे सुभाष हिंगमिरे यांनी खरेदी केला. तर याच दुकानात संजय बसाप्पा लोप्पी रा. उमदी ता. जत या शेतकऱ्यांनी 51 बॉक्स नवीन हिरवा बेदाणा विक्रीसाठी ठेवला होता. या बेदाण्यास 511 रूपये असा दर मिळाला.हा बेदाणा मनोहर सारडा, सांगली यांनी खरेदी केला.
- उच्चांकी दराचा बहुमान धारेश्वरला
तासगांव बेदाणा बाजारपेठेत चांगल्या प्रतिच्या बेदाण्यास नेहमीच अपेक्षित व उच्चांकी दर मिळाला आहे. बाजार पेठ स्थापनेपासून आत्तापर्यंत सुमारे 400 रूपये दर बेदाण्यास मिळाला होता. मात्र आत्तापर्यंत सर्व रेकॉर्ड शनिवारी मोडले आहे. या सौद्यात नवीन हिरवा बेदाण्यास 651 रूपये असा उच्चांकी दर मिळाला असून पश्चिम महाराष्ट्रात आत्तापर्यंतचा सर्वाधिक हा दर असून या ऐतिहासिक उच्चांकी दराचा बहुमान मे.धारेश्वर ट्रेडींग कंपनीला मिळाला आहे. यावेळी बाजार आवारात एकूण 1700 टन-170 गाडी आवक होऊन 1050 टन-105 गाडी बेदाण्याची विक्री झाली. सौद्यात हिरवा बेदाण्यास 210 ते 651, पिवळा बेदाण्यास 180 ते 255 व काळा बेदाण्यास 80 ते 150 रूपये प्रति किलोस दर मिळाला.
यावेळी मनोज मालू, सतिश माळी, सुदाम माळी, जगन्नाथ घणेरे, सुभाष हिंगमिरे, सुनिल हडदरे, केतन सुचक, गणेश माने, विनीत बाफना, विनायक हिंगमिरे,बबलू पाटील, राजेंद्र माळी, किरण बोडके, विठ्ठलतात्या पाटील, राहुल बाफना, पनू सारडा, कौस्तुभ हिंगमिरे, प्रकाश लुनिया, शितल खेराडकर, सन्मेख बोथरा, यांच्यासह सर्व खरेदीदार व्यापारी तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
- बेदाणा तासगांव बाजारपेठेत विक्रीसाठी आणावा
तासगांव बाजार समितीने नेहमीच शेतकऱ्यांचे हित डोळयासमोर ठेऊन पाऊले टाकली आहेत. येथील बेदाणा बाजारपेठेत चांगल्या प्रतिच्या बेदाण्यास अपेक्षित व उच्चांकी दर मिळत आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा तासगांव बेदाणा बाजारपेठेत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती युवराजदादा पाटील यांनी केले आहे.