नवे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू शपथबद्ध
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराध्ये यांनी दिली शपथ
प्रतिनिधी/ पणजी
गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून माजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री पुसापती अशोक गजपती राजू यांना काल, शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराध्ये यांनी शपथ दिली. राजभवनातील नव्या दरबार सभागृहात शपथ घेणारे नवनियुक्त राज्यपाल हे पहिले राज्यपाल ठरले आहेत. नव्या राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्याला आंध्रप्रदेश राज्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराध्ये, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, केंद्रीय नागरी वाहतूकमंत्री के. राजमोहन नायडू, त्यांचे मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, विविध खात्यांचे सरकारी अधिकारी, नौदल, लष्करातील अधिकारी, मुख्यमंत्री सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांची उपस्थिती होती.
राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेला राज्यपाल नियुक्तीचा आदेश राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी वाचून दाखवला. त्यानंतर नोंदवहीत सह्या झाल्या. त्या सोपस्कारानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराध्ये यांनी पुसापती अशोक गजपती राजू यांना शपथ दिली. त्यांनी ही शपथ इंग्रजीतून घेतली.
शपथविधी सोहळा झाल्यानंतर पुसापती अशोक गजपती राजू यांना राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठी गर्दी झाली होती. आंध्रातून आलेल्या नागरिकांनी तेथील परंपरा आणि प्रथेनुसार शाली आणल्या होत्या. त्यातील काही शाली ह्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही आंध्रातील नागरिकांनी घातल्या.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हे शुक्रवारीच गोव्यात दाखल झाले होते. त्यांच्यासमवेत पत्नी, दोन मुली, भगिनी आल्या होत्या. त्याचबरोबर शपथविधी सोहळ्यासाठी काल रात्रीपासूनच आंध्रातील नागरिकांनी राज्यात येणे सुरू केले होते. जुन्या दरबार सभागृहात लोकांची संख्या जास्त होईल, या उद्देशाने नव्या दरबार सभागृहात शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दरबार सभागृहात मोठी गर्दी
राजभवनातील नव्या दरबार सभागृहात शपथविधी सोहळ्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आंध्रप्रदेशातील तसेच गोव्यात स्थायिक असलेल्या आंध्रातील नागरिकांनी या सोहळ्याला मोठी उपस्थिती लावली होती. त्यामुळे हा सभागृह खचाखच भरला होता. यामध्ये तेलगू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.