न्यू गांधीनगरचा नकार; अमननगरचा होकार
रेल्वे उड्डाणपुलाबाबत स्थानिकांची भूमिका : आमदार असिफ सेठ यांच्यासोबत केली चर्चा
बेळगाव : न्यू गांधीनगर येथे होऊ घातलेल्या उड्डाणपुलाला काही रहिवाशांनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी विरोध केला. अमननगर येथील नागरिकांनी उड्डाणपुलाचे समर्थन केले तर न्यू गांधीनगर येथील नागरिकांनी आपला विरोध व्यक्त केला. यामुळे येत्या चार दिवसांत रेल्वे अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींची चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार असिफ सेठ यांनी दिले. सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी आपापली मते मांडली. आमदार असिफ सेठ यांच्यासमवेत पोलीस अधिकारी जे. एम. कालीमिर्ची यांच्यासह मुस्लीम धर्मगुरु व इतर नागरिक उपस्थित होते. उड्डाणपुलाचे बांधकाम केल्यास वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका होणार आहे. तसेच हा उड्डाणपूल अमननगर येथील रहिवाशांसाठी फायदेशीर ठरेल, अशी भूमिका अमननगर येथील नागरिकांनी व्यक्त केली. भविष्यात रेल्वे वाहतूक वाढली जाणार असल्याने वाहतुकीस अजून मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
यामध्ये नागरिकांचा वेळ वाया जाणार असून कायमचा उपाय म्हणून उड्डाणपुलाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट मत अमननगर येथील जमातचे सदस्य एहजाज हाकीम यांनी व्यक्त केले. न्यू गांधीनगरच्या रहिवाशांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. दोन दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनाप्रमाणेच नगरसेवक अझीम पटवेगार यांनी उड्डाणपुलाला विरोध दर्शवला. उड्डाणपुलामुळे न्यू गांधीनगर येथील व्यवसाय ठप्प होणार असून भविष्यात पाणी साचण्याची शक्मयता त्यांनी वर्तविली. त्यामुळे उड्डाणपूल अथवा कायमस्वरूपी भिंत बांधू नये, अशी प्रतिक्रिया न्यू गांधीनगरच्या नागरिकांनी मांडली.दोन्ही बाजूंचे मत जाणून घेतल्यानंतर आमदार असिफ सेठ म्हणाले, रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रस्तावाबाबत परिसरातील नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अमननगर व न्यू गांधीनगर येथील काही पदाधिकाऱ्यांना घेऊन पुन्हा बैठक घेतली जाईल. त्यानंतरच निर्णय जाहीर केला जाईल, असे ते म्हणाले. यावेळी आयुब जकाती, फहीम नाईकवाडी, नाझिम नाईकवाडी, अकबर बागवान, अश्पाक शेख, अली मशीदचे मौलाना यांच्यासह अमननगर व न्यू गांधीनगर येथील रहिवासी उपस्थित होते.