‘लीप’ अंतर्गत नवे उद्योजकता केंद्र
राज्य सरकारची घोषणा : कलबुर्गीत स्थापन होणार
बेंगळूर : राज्य सरकारने इकॉनॉमिक अॅक्सिलरेशन प्रोग्राम (लीप) अंतर्गत कलबुर्गी येथे नवीन उद्योजकता केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. 1,000 कोटी रुपये खर्चुन राबविण्यात येणारा हा पाच वर्षांचा उपक्रम आहे. यामुळे प्रादेशिक उद्यमशिलतेला उर्जितावस्था प्राप्त होईल. स्टार्टअप्सचे यामुळे विकेंद्रीकरण होणार असून राज्यातील उदयोन्मुख तंत्रज्ञान समूहांमध्ये आर्थिक विकासाला गती मिळेल. कृषीकल्प प्रतिष्ठानच्या भागीदारीत उद्योजकता केंद्र स्थापन केले जाणार आहे. कल्याण कर्नाटक भागातील स्टार्टअप व्यवस्था मजबूत करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. कृषी, कृषी संबंधित क्षेत्रे, ग्रामीण नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने 15,000 चौ. फूट जागा दिली आहे.
या प्रदेशासाठी एक समर्पित स्टार्टअप केंद्र म्हणून काम करेल. स्टार्टअप संस्थापक, कृषी-उद्योजक, नवोपक्रमक आणि पूरक उद्योगांमधील भागीदारांना आवश्यक ते समर्थन प्रदान करणार आहे. उद्योजकता केंद्र हे स्टार्टअप्सना गती देणे, क्षमता निर्माण करणे आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे या तत्त्वांनुसार मार्गदर्शन, बाजारपेठ प्रवेश आणि वित्तपुरवठा प्रवेश या चौकटीत काम करेल. पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेतील प्रवेशातील अडथळे कमी करून स्टार्टअप्सना स्थानिक पातळीवर जागतिक दर्जाच्या सुविधा, बांधणी आणि चाचणी करण्यास अत्याधुनिक प्रोटोटाइपिंग लॅब देखील स्थापन केली जाईल.
5 लाख रोजगार निर्मिती : प्रियांक खर्गे
इकॉनॉमिक अॅक्सिलरेशन प्रोग्राम अंतर्गत कलबुर्गी येथे नवीन उद्योजकता केंद्र स्थापनेची घोषणा करताना मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले, कलबुर्गी भागातील 70 टक्क्यांपेक्षा जास्त कामगार कृषी अर्थव्यवस्थेत योगदान देतात. ‘लीप’ उपक्रमांतर्गत आणि नवीन उद्योजकता केंद्राद्वारे आम्ही आमच्या समुदायांमध्ये तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि संधी देणार आहे. याद्वारे ग्रामीण आणि शहरी भागात असणारी दरी लक्षणीयरित्या भरून काढणार आहे. राज्यातील आयटी-बीटी क्षेत्राची उलाढाल 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.