नवोदित डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्यावर भर द्यावा
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन : ‘केएलई’ अभिमत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ थाटात
बेळगाव : देशातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नवोदित डॉक्टरांनी शिक्षणाचा अभिमान बाळगावा, त्याचा आदर करावा आणि या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करावा. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनाची प्रामुख्याने जेरियाट्रिक व मानसिक आरोग्य क्षेत्रात संशोधनाची गरज आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य सेवेमध्ये बदल घडवून आणावा, अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायन व खत विभागाचे मंत्री जगत्प्रकाश नड्डा यांनी व्यक्त केली. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (अभिमत विद्यापीठ) चा पंधरावा पदवीदान समारंभ जेएनएमसीच्या शताब्दी सभागृहात शानदारपणे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा खाते तसेच पुनऊ&र्जा खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे व डॉ. शैलेश श्रीखंडे उपस्थित होते. यावेळी जे. पी. नड्डा म्हणाले, आरोग्य क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक बदल करण्यात आले आहेत. नवोदित डॉक्टरांनी हे बदल जाणून आपले आरोग्य धोरण समजून घ्यायला हवे. एक काळ असा होता की, भारतात शिकून डॉक्टरांसह अनेकजण परदेशात स्थायिक होत. आज भारतीय डॉक्टर केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर आरोग्य सेवा देण्याइतके सक्षम झाले आहेत.
स्त्राrरोग तज्ञ होणार : डॉ. श्वेता गोरे
या पुढील काळात आयुर्वेद शास्त्राला महत्त्व येणार आहे. आपली पारंपरिक औषध पद्धत अतिशय परिणामकारक असून त्याची माहिती समाजात पोहोचविण्याची गरज आहे. मी आयुर्वेद अभ्यासक्रम निवडला असून मला स्त्री रोग व प्रसूती तज्ञ होण्याची इच्छा आहे, असे केएलई आयुर्वेदिक कॉलेजच्या चार सुवर्णपदकांची मानकरी डॉ. श्वेता गोरे हिने सांगितले. ‘तरुण भारत’शी बोलताना ती म्हणाली, मी मूळची अक्कलकोटची आहे. तेथील केएलईच्या शाळेतच माझे शालेय शिक्षण झाले. हुबळी येथील केएलईच्या प्रेरणा कॉलेजमधून पीयूसी झाल्यानंतर मला बेळगावच्या कंकणवाडी आयुर्वेद कॉलेजमध्ये मेरिट सिट मिळाली. डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न होते. आज त्या स्वप्नाची पूर्तता झाली आहे. आयुर्वेद ही महत्त्वाची शाखा असून ती गुणकारी आहे, असेही ती म्हणाली. तिच्या सोबत वडील राजशेखर, आई श्रीदेवी, बहीण श्रुती व भाऊ राकेश उपस्थित होते.
काँग्रेस सरकारला टोला
पंतप्रधान मोदी यांचे सरकार आरोग्य सेवेमध्ये पारदर्शकता आणून सर्व सामान्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे, यासाठी प्रयत्नशील आहे. काही राज्यांतील सरकारे सर्वसामान्य व गरिबांसाठी असणारी जनौषधी केंद्रे बंद करत आहेत हे दुर्दैवी आहे, असा टोला प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा उल्लेख न करता लगावला.
मंत्री नड्डांकडून दिलगिरी
काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी दहा वर्षांपूर्वी मला बेळगावला येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु मला येणे जमले नाही. आज केएलई व काहेर संस्था आणि त्यांची प्रगती पाहून आपण येण्यास उशीर केला. याबद्दल मी कोरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो, असे जे. पी. नड्डा म्हणाले.