For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘जी-20’ मुळे भारतीय स्टार्टअप क्षेत्राला नवी दिशा

06:47 AM May 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘जी 20’ मुळे भारतीय स्टार्टअप क्षेत्राला नवी दिशा
Advertisement

‘जी-20’ मुळे सदस्य देशांच्या जनसामान्यांशी संबंधित व विभिन्न देशांशी निगडित जिव्हाळ्याच्या मुद्यांना जागतिक आयाम लाभले आहेत. नाविन्यता, प्रयोगशीलता व कल्पकतेवर आधारित असे नव-उद्योजकांचे स्टार्टअप क्षेत्र ‘जी-20’च्या कल्पक कक्षेला अपवाद नाही. या स्टार्टअप कंपन्यांनी केवळ व्यापार, व्यवसाय इत्यादीचाच विचार न करता जागतिक स्तरावर नैसर्गिक व आव्हानपर अशा संकटांचा अंदाज घेऊन प्रसंगी त्यावर आंतरराष्ट्रीय सहकार्यासह मात करण्याचे नवीन तंत्र आणि तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या नव्या व नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे स्टार्टअपद्वारा जागतिक स्तरावरील स्थायी विकासाला चालना देण्याचा नवा प्रयत्न ‘जी-20’ च्या निमित्ताने होणार आहे. जागतिक स्तरावरील स्टार्टअप क्षेत्रासाठी हा आशादायी प्रयत्न ठरणार आहे.  या प्रकरणाची पार्श्वभूमी म्हणजे आज जगासमोर विविध प्रकारची आव्हाने आहेत. त्यामध्ये विविध नैसर्गिक संकटांचे आव्हान सर्वतोपरी आहे. जगभरातील बहुधा प्रत्येक देशातील अधिकांश नागरिकांनी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात नैसर्गिक संकटांचा सामना केलेला आहे. अथवा तशी भीषण परिस्थिती कुठल्याही देशापुढे येऊ शकते. तुर्कस्तानमधील भीषण भूकंप हे यासंदर्भातील ताजे उदाहरण म्हणता येईल.

Advertisement

जागतिक स्तरावर नैसर्गिक संकटांची मालिका सुरुच असते. या संकटांच्या परिणामी अकस्मित मृत्यू वा जखमी होणे, घरांची मोठ्या प्रमाणात पडझड, घर वा संपत्तीची हानी, विभिन्न आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागेल. प्रशासकीय समस्यांचा सामना करावा लागणे हे नैसर्गिक संकटांचे जागतिक स्वरुप प्रामुख्याने व दृश्य स्वरुपात असते. मात्र याच्याच जोडीला मोठ्या नैसर्गिक संकटांचा परिणाम, शेती, कृषी, फळबागा, दूध उत्पादन, मासेमारी, वन्यजीव व थोडक्यात म्हणजे संपूर्ण निसर्ग व वातावरणासह पर्यावरणावर होत असतो. इथेच साऱ्या जगासह मानवतेपुढे वाढत्या आव्हानपर स्वरुपात उभ्या ठाकणाऱ्या समस्यांवर ठोस प्रतिबंधात्मक व परिणामकारक तोडग्यांची गरज प्रामुख्याने भासते. यातच नव्या स्टार्टअप संकल्पनांची जागतिक गरज स्पष्ट होते. अशा स्टार्टअप कंपन्या तीव्र स्वरुपाचे भूकंप मोठी सुनामी, तीव्र वेगाचे चक्रीवारे या आणि अशा प्रसंगी घटनापूर्व निदान व नंतरची उपाययोजना या क्षेत्रात निश्चित स्वरुपात काम करू शकतात. भारत आणि भारतीय या नव्या क्षेत्रात आपले विशेष योगदान आवश्य देऊ शकतात. हे पुढील निवडक उदाहरणांवरून अधिक स्पष्ट होते.

उदाहरणार्थ अद्ययावत वाहन पद्धतीवर आधारित अशा ‘वन कन्सर्न’ या स्टार्टअपने अंतराळ यानातील छायाचित्रण पद्धतीशी सांगड घालून जगात विविध ठिकाणी होऊ घातलेल्या नैसर्गिक आपत्तींचा छडा लावण्याची नवी व अभिनव पद्धती विकसित केली. या कामी कृत्रिम बुद्धिमत्ता व अद्ययावत मशीन तंत्रज्ञानाचा नेमका उपयोग करण्यात आला. याकामी प्रगत संगणकीय प्रणालीची जोड देण्यात आली. परिणामी महापूर वा प्रलयसदृश्य स्थितीचे जागतिक पातळीवरील पूर्वानुभाव आता शक्य झाले आहे हे विशेष.

Advertisement

या स्टार्टअपमुळे जागतिक स्तरावरील प्रस्तावित भीषण दुर्घटनांची आगाऊ नोंद, पूर्वसूचना व त्यानुरुप प्रतिबंधात्मक उपाययोजना आता आवाक्यात आल्याने अनेकांचा व्यावसायिक कल या नव्या आणि प्रगत स्टार्टअपकडे वाढत्या प्रमाणात दिसून येतो. मोठे उद्योग व व्यावसायिक कंपन्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात फार मोठे काम करणाऱ्या या छोट्या स्टार्टअपकडे व्यावसायिक उत्साहापोटी आकृष्ट झाल्या आहेत. परिणामी आपल्या प्रयोगाच्या यशस्वी अल्पावधीतच ‘वन कन्सर्न’ युनिकॉर्न स्वरुपाचा जागतिक स्तरावरील आर्थिक दर्जा प्राप्त करण्यास सिद्ध झाले आहे.

भीषण वा अचानक उद्भवलेल्या भीषण आपत्तींवर केवळ उपाययोजना करणेच नव्हे तर त्यावर यशस्वी आणि प्रभावीपणे मात करण्याकामी स्टार्टअप कंपन्या पुढाकार घेत असल्याचे सुखद चित्र आता दिसायला लागले आहे. याद्वारे येणाऱ्या गंभीर संकटांवर मात केल्यास केवळ संबंधित देशासाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक-सामाजिक योगदान देण्याच्या उद्देशाने अशा स्टार्टअप कंपन्या यशस्वीपणे कार्यरत आहेत.

यासंदर्भातील नवे व वैशिष्ट्यापूर्ण स्टार्टअप म्हणून ‘गरुडा’ या भारतीय स्टार्टअप कंपनीचा आवर्जुन व विशेष उल्लेख करावा लागेल. त्यातही पण ताजे उदाहरण म्हणजे ‘गरुडा एरोस्पेस’ या नव्या भारतीय स्टार्टअपने भीषण भूकंपग्रस्त अशा तुर्कस्थानातील विविध ठिकाणी विखुरलेल्या ढिगाऱ्यांखाली वाचलेल्या व मदतीची आर्त हाक देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा नेमका ठिकाणा शोधण्यासाठी ड्रोन या विकसित पद्धतीचा नेमका उपयोग केला. भारतीय स्टार्टअप तंत्रज्ञानाची ही विकसित शैली व त्याची उपयुक्तता यांची विशेष नोंद यानिमित्ताने उभ्या जगाने घेतली आहे. विकसित व अद्ययावत संगणकीय तंत्रज्ञानाचा उपयोग जागतिक स्तरावर व विकसनशील देशांसाठी केला जाऊ शकतो. याकामी जी-20चा मंच दिशादर्शक स्वरुपात आवश्य काम करू शकेल. छोटेखानी स्टार्टअपनी याकामी आधीच पुढाकार घेतला असून त्याला अधिक चालना देणे गरजेचे ठरते. वाढीव संवाद क्षमता, संकटकालीन तातडीने करावयाची उपाययोजना, वाहन-वाहतुकीचे संचालन-नियंत्रण, हवामान अंदाज व गरजेनुरुप उपाययोजना ही कामे यापूर्वीच स्टार्टअप यंत्रणांद्वारे करण्यात येत आहेत.

यासंदर्भात ‘माय रेस्क्यूआर’ या स्टार्टअपच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करावा लागेल. तातडीच्या वा आणीबाणीच्या प्रसंगी संकटात सापडलेले व अशा कठीण परिस्थितीत उपाययोजना करण्याचे सोपे व प्रभावशाली तंत्रज्ञान ‘माय रेस्क्यू आर’ स्टार्टअपने उपलब्ध करून दिले आहे. या नव्या प्रणालीमध्ये स्टार्ट क्यू आर कोडच्या माध्यमातून तातडीच्या व गरजेच्या प्रसंगी आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका, प्रथमोपचार, विशेष वैद्यकीय उपचार, रुग्णालय संपर्क व सल्ला इ. सेवा अत्यल्प काळात व सहजगत्या उपलब्ध होत आहेत. या भारतीय उपक्रमाची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.

याचाच परिणाम म्हणून जगातील प्रगतीशीलच नव्हे तर प्रगत देशसुद्धा आपत्कालीन कार्यप्रणालीसह संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञानाच्या आधारे भारतीय स्टार्टअप व्यवस्थेच्या यशामुळे प्रभावित झाले आहेत. यापैकी अधिकांश देश या बाबी भारत आणि भारतीयांकडून प्रांजळपणे शिकण्यासाठी सिद्ध झाले आहेत. विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार व परस्पर शैक्षणिक-संशोधनपर करारांमुळे भारतीय स्टार्टअप व्यवस्था गतिमान झाली आहे. जी-20मुळे भारताच्या स्टार्टअप व्यवस्थेला गतिमानतेशिवाय स्थायित्व मिळणे सहज शक्य आहे.

भारतीयांच्या  स्टार्टअप क्षेत्रातील आजवरच्या यशस्वी कामगिरीचा परिणाम जी-20 अंतर्गत स्टार्टअप समूहावर होणे अपरिहार्य ठरते. यातील पहिल्या टप्प्यातच सुमारे 30 देश आणि त्यांचे प्रशासक प्रतिनिधी यांनीच नव्हे तर ‘इंटरपोल’ सारख्या प्रतिष्ठित जागतिक संस्थेने भारतीय स्टार्टअप कंपन्यांकडून सहकार्य समन्वयाच्या भावनेतून विशेषत: नैसर्गिक आपत्ती, अवघड व भीषण प्रसंगी अद्ययावत संवाद संपर्कासह करावयाची उपाययोजना व तोडगा शोधणे यासारखे प्रशिक्षण घेण्याची तर पूर्वतयारी सुरू केली आहे. भारत आणि भारतातील स्टार्टअप कंपन्यांचे विशेष मोलाचे योगदान म्हणजे त्यांनी नैसर्गिक आपत्ती वा तत्सम प्रसंगी उपाययोजनेसाठी आधुनिक व संगणकीय तंत्रज्ञान विकसित करून जी-20 च्या निमित्ताने जगाला दिले असे नाही तर अशा संकटांचा सुनियोजित आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे तंत्रज्ञान विकसित व सिद्ध करून जगाला दिले आहे. भारतीय स्टार्टअपच्या यशस्वी कामगिरीचा हा आलेख जी-20च्या पण पलीकडे जाणारा ठरला आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.