बेळगाव अधिवेशनापर्यंत नवे मुख्यमंत्री !
बी. वाय. विजयेंद्र यांचे भाकीत, विकासकामे खुंटल्याचा आरोप
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सध्या कोमात आहे. राज्यात विकासकामे खुंटली आहेत. बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत कर्नाटकात नेतृत्व बदल होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येणार हे निश्चित आहे. हिवाळी अधिवेशनापर्यंत नवे मुख्यमंत्री असतील, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी व्यक्त केले आहे.
बी. वाय. विजयेंद्र गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, हरियाणा व जम्मू-काश्मीरमधील निवडणूक निकालाने काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या बोगस गॅरंटींपेक्षा नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासच श्रेष्ठ ठरला आहे. या दोन्ही राज्यात मतदारांनी काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे. या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवरही होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात विकास खुंटला आहे. मंत्र्यांचे जिल्हा दौरे बंद झाले आहेत. मुडा भूखंड घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. सिद्धरामय्या आपल्या सत्तेचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत, हे मंत्री-आमदारांना माहीत आहे. तरीही त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या नावाचा जप सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी चौदा भूखंड मुडाला परत केले आहेत. याचाच अर्थ घोटाळा झाला आहे, असा होतो. भूखंड परत करणारे मुख्यमंत्री विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर चर्चेला का तयार नव्हते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नेतृत्व बदलासाठी गुप्त बैठकांना जोर
सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री असणार, असे त्यांच्या पक्षाचे नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे नेतृत्व बदलासाठी गुप्त बैठका वाढल्या आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सिद्धरामय्या राजीनामा देणार, असे भाकीत व्यक्त करतानाच काँग्रेस सरकारला उत्तर कर्नाटकाचा विसर पडला आहे. हे सरकार केवळ बेंगळूर केंद्रीत राहिले आहे. 136 आमदारांच्या संख्याबळावर काँग्रेस सत्तेवर आहे, आम्ही विरोधी पक्षात आहोत. मुख्यमंत्री ए-वन आहेत. याचा अर्थ विकासात एक नंबरवर आहेत, असा होत नाही. ते आरोपी क्रमांक एकवर आहेत, असेही विजयेंद्र यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी, खासदार इराण्णा कडाडी, पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके,विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, अॅड. एम. बी. जिरली यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.
आपण पाठ फिरवणार नाही-विजयेंद्र
तुम्ही सतीश जारकीहोळी यांची भेट कशासाठी घेतला? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता. रमेश जारकीहोळी यांना शोधत होतो, सतीश जारकीहोळी भेटले, मी काय करू? अशी विचारणा करीत विजयेंद्र यांनी मिश्किल हास्य केले. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना भेटलो. पक्षातील वरिष्ठ तुमचे नेतृत्व मानत नाहीत, याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता त्याला थोडा वेळ लागणार, आपण वरिष्ठांचा सल्ला मनापासून स्वीकारतो. आव्हाने आहेत म्हणून आपण पाठ फिरवणार नाही. आव्हानांना सामोरे जाण्याची शिकवण येडियुराप्पा यांनी आपल्याला दिली आहे, असे विजयेंद्र यांनी सांगितले.