ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी नवा कर्णधार
ऋतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमारला संधी मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 19 नोव्हेंबरला संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका भारतात खेळवली जाणार असून दुखापतीने त्रस्त असलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या या मालिकेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले. हार्दिक पंड्याला ही दुखापत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना झाली होती. त्याचा घोटा मुरगळला होता. ही दुखापत बरी होण्यास अद्याप त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे विश्वसनीय गोटातून सांगण्यात आले. दरम्यान या मालिकेसाठी भारतीय संघातील अनेक अव्वल खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याने ऋतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाकडे नेतृत्व सोपवण्याची शक्यता आहे. या आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मुंबई उपांत्य सामन्यानंतर केली जाईल. येत्या डिसेंबर महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दोन संघातील टी-20 मालिकेला दरबानमध्ये 10 डिसेंबरपासून प्रारंभ होईल. या मालिकेसाठी हार्दिक पंड्या कदाचित उपलब्ध होईल, अशी आशा बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सदस्याने व्यक्त केली आहे.
आयसीसीची 2024 सालातील पुरुषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने भूषविली जाणार आहे. सदर स्पर्धा पुढील वर्षीच्या जून-जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी आतापासूनच भारतीय निवड समिती विचार करीत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आयर्लंडमध्ये खेळलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटूंना या आगामी विश्वचषक टी-20 स्पर्धेसाठी निवडीचे झुकते माप दिले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जसप्रित बुमराह, मोहमद सिराज हे सध्या भारतीय संघातील आघाडीचे वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात. या दोन्ही गोलंदाजांच्या व्यतिरिक्त अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेशकुमार यांची निवड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी केली जाण्याची शक्यता आहे. संजू सॅमसन, इशान किसन, यजुवेंद्र चहल यांचे संघात पुनरागमन होईल असे वाटते. अष्टपैलू अक्षर पटेल हा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला नसल्याने निवड समिती रवींद्र जडेजाची निवड करेल.