For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कदापिही रेल्वेओव्हरब्रिज होऊ देणार नाही!

11:05 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
कदापिही रेल्वेओव्हरब्रिज होऊ देणार नाही
Advertisement

तानाजी गल्लीसह इतर परिसरातील जनतेचा बैठकीत निर्धार : रेल्वे प्रशासनाकडून सर्व्हे सुरू असल्याने विरोध

Advertisement

बेळगाव : कपिलेश्वर रेल्वेओव्हरब्रिज, जुन्या धारवाड रोडवर रेल्वेओव्हरब्रिजची उभारणी करण्यात आली असताना अचानकपणे तानाजी गल्ली येथेही रेल्वेओव्हरब्रिज उभा करण्याचा घाट घालण्यात आला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून सर्व्हे सुरू असल्याने तानाजी गल्ली परिसरातील जनतेने तातडीने बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत आम्ही रेल्वेओव्हरब्रिज होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार केला आहे. महाद्वार रोड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये गुरुवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये त्याला तीव्र विरोध करण्याचे ठरविण्यात आले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बैठक आहे. त्याठिकाणी हजर राहून अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपला विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात येणार आहे. याचबरोबर कमिटीदेखील स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही परिस्थितीत तीव्र लढा देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, महाद्वार रोड, ताशिलदार गल्ली, फोर्ट रोड येथील जनतेला या रेल्वेओव्हरब्रिजमुळे मोठा फटका बसणार आहे. याठिकाणी अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय खूप वर्षांपासून करत आहेत. याचबरोबर अनेकांनी मोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत. अनेकजण घरे बांधून राहत आहेत. जर याठिकाणी रेल्वेओव्हरब्रिज उभारण्यात आला तर येथील सर्व व्यवसाय बंद होणार आहेत. याचबरोबर अनेकजण बेघर होणार आहेत. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा ओव्हरब्रिज होऊ देणार नाही, असे या बैठकीत सांगण्यात आले. येथील जनता तीव्र लढा देणार आहे. या लढ्यामध्ये आम्ही सहभागी राहू, असे या परिसरातील नगरसेवक नेत्रावती भागवत, इंद्रजित पाटील, राजू भातकांडे, माजी नगरसेवक वैशाली हुलजी यांनी स्पष्ट केले. खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन त्यांना माहिती देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. यावेळी यश हॉस्पिटलचे डॉ. एस. के. पाटील, अनिल देसाई, सचिन हंगिरगेकर, रवी हुलजी, पांडुरंग जाधव, अनिल पाटील, चंद्रकांत कामुले, तेजस होनगेकर यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी, परिसरातील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.