For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनेचे नेटवर्क उद्ध्वस्त

06:13 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनेचे नेटवर्क उद्ध्वस्त
Advertisement

वृत्तसंस्था / श्रीनगर 

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये ‘तेहरिक लाबैक’ या इस्लामी दहशतवादी संघटनेचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या संघटनेच्या विरोधात जम्मू-काश्मीर पोलिसांच्या फुटीरता विरोधी कक्षाने ही कारवाई केली आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून ही संघटना तरुणांमध्ये धर्मांधतेचे विष पेरण्याच्या प्रयत्न करत होती. तसेच दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठीही या नेटवर्कचा उपयोग केला जात होता, अशी माहिती देण्यात आली आहे.

ही संघटना पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबा या संघटनेची शाखा म्हणून कार्यरत होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले. याच संघटनेने तीन दिवसांपूर्वी या प्रदेशात करण्यात आलेल्या सात व्यक्तींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. या संघटनेच्या अनेक कार्यालयांवर मंगळवारी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. ही संघटना नव्याने स्थापन करण्यात आली आहे. ‘बाबा हमास’ या टोपण नावाने वावरणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाने ही संघटना निर्माण केली आहे.

Advertisement

अनेक जिल्ह्यांमध्ये कारवाई

या संघटनेने अल्पकालावधीतच जम्मू-काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हातपाय पसरले होते. त्यामुळे श्रीनगर, गांदरबाल, बांदीपोरा, कुलगाम, बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यांमध्ये अनेक स्थानी एकाच वेळी धाडी घालण्यात आल्या. गुप्तचरांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ही संघटना दहशतवाद्यांना भरती करण्याचे केंद्र चालवत आहे, अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस विभाग सावध झाला होता. पूर्ण तयारीनिशी एकाच फटक्यात कारवाई करण्यात आल्याने या संघटनेची पाळेमुळे उखडण्यात यश आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, अद्यापही या संघटनेचे हस्तक काही स्थानी कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.