For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेटफ्लिक्सने हटविली वादग्रस्त दृष्ये

06:45 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेटफ्लिक्सने हटविली वादग्रस्त दृष्ये
Advertisement

कंदाहार प्रकरणाच्या मालिकेमध्ये केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर केले परिवर्तन

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

संवेदनशील मुद्द्यांवरील मालिका प्रदर्शित करताना, देशातील जनतेच्या भावनांचा विचार करून मालिकांचा आढावा या पुढच्या काळात घेण्यात येईल, असे प्रतिपादन ‘नेटफ्लिक्स’ या ओव्हर द टॉप मंचाने केंद्र सरकारकडे केले आहे. त्यानुसार सध्या प्रदर्शित केल्या जात असलेल्या कंदाहार विमान अपहरणासंबंधीच्या मालिकेत आवश्यक ती सुधारणा नेटफ्लिक्सने केली असून या मालिकेतील वादग्रस्त संवाद आणि दृष्ये हटविण्यात आली आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

1999 मध्ये दहशतवाद्यांनी भारताचे प्रवासी विमान पळविले होते. त्यासंदर्भातील मालिका नेटफ्लिक्सच्या माध्यमातून प्रदर्शित केली जात आहे. मात्र, या मालिकेतील काही संवाद आणि दृष्यांवरून वाद निर्माण झाला होता. त्यासंदर्भात केंद्रीय सूचना आणि प्रसारण विभागाने नेटफ्लिक्सच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. या अधिकाऱ्यांनी विभागाच्या मुख्य सचिवांची भेट मंगळवारी घेतली होती.

1999 मध्ये विमान अपहरण 

भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण जैश-ए-मोहम्मद या इस्लामी दहशतवादी संघटनेने 1999 मध्ये केले होते. त्यावेळी भारतात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकार होते. काश्मीरमधून विमान पळवून ते अफगाणिस्तानातील कंदाहार येथे उतरविण्यात आले होते. सरकारने काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांना मुक्त करून या विमानातील प्रवाशांची आणि विमानाची सुटका केली होती. या प्रसंगावर आधारित मालिका सध्या नेटफ्लिक्सवरून दाखविली जात आहे.

वाद काय आहे ?

विमानाचे अपहरण इस्लामी दहशतवाद्यांनी केले होते. तथापि, या मालिकेत अपहरण करणारे दहशतवादी एकमेकांचा उल्लेख, भोला, शंकर, बर्गर, चीफ आदी नावांनी करत असल्याचे दाखविण्यात येत होते. या नावांमधील भोला आणि शंकर या नावांना अनेक दर्शकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ही नावे हिंदूंची आहेत. त्यामुळे हे अपहरण हिंदूंनी केले असा अनेक लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे, असा मुद्दा आक्षेप घेणाऱ्यांनी मांडला होता. तसेच या मालिकेचा हेतू ही घटना मांडणे हा नसून त्याच्या आडून हिंदू धर्माची अवमानना करणे आणि समाजाची दिशाभूल करणे हा आहे, अशीही टीका केली जात होती.

मालवीय यांचाही प्रहार

भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनीही या मालिकेतील दहशतवाद्यांच्या नावांवर आक्षेप घेतला होता. अशी नावे दहशतवाद्यांना दिल्याने चुकीचा संदेश समाजात जात आहे. ही मालिका आणखी काही दशकांच्या नंतर कोणी पाहिली, तर हे विमानाचे अपहरण हिंदूंनीच घडविले होते, असा त्यांचा समज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सने ही नावे बदलावीत आणि दहशतवाद्यांची खरी नावे स्पष्ट करावीत, अशी मागणी मालवीय यांनी त्यांच्या इंटरनेट पोस्टमध्ये आग्रहाने केली होती.

दहशतवाद्यांची खरी नावे...

कंदाहार विमान अपहरण कांडातील दहशतवाद्यांची खरी नावे, इब्राहिम अख्तर, शहीद अख्तर सय्यद, सनी अहमद काझी, जहूर इब्राहिम मिस्त्री आणि शकीर अशी होती. ही बाब या प्रकरणाच्या चौकशीत स्पष्ट झाली होती. मात्र, हे दहशतवादी विमान कंदाहारला घेऊन जात असताना एकमेकांना वेगळ्या नावांनी संबोधत होते. नेटफ्लिक्स मालिकेत या दहशतवाद्यांची खरी नावे, हेतूपुरस्सर लपविण्यात आली आहेत, असा आक्षेप अनेकांनी घेतला होता.

विभागाकडून पाचारण

बहुसंख्य लोकांच्या संवेदनशीलतेची नोंद घेऊन केंद्र सरकारच्या सूचना आणि प्रसारण विभागाने नेटफ्लिक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस देऊन पाचारण केले होते. या अधिकाऱ्यांनी मंगळवारी केंद्रीय सूचना आणि प्रसारण सचिवांची भेट घेतली आणि भूमिका स्पष्ट केली. या मालिकेचे पुढचे भाग दाखविताना आणि इतर मालिकांच्या संदर्भातही यापुढे देशाच्या संवेदनशीलतेचा विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी सचिवांना दिले होते. आमचा हेतू जनतेच्या भावना दुखावणे हा नव्हता, असेही नेटफ्लिक्सने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.