छत्तीसगडमध्ये 9 नक्षलींना कंठस्नान
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा भागात सुरक्षा सैनिकांनी 9 नक्षलींचा खात्मा केला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत सुरक्षा सैनिक आणि नक्षलींमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत कोणत्याही सुरक्षा सैनिकाला इजा झाली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. दंतेवाडा हा नेहमीच नक्षलींच्या प्रभावाखालचा प्रदेश म्हणून मानला गेला आहे. दंतेवाडाच्या वनभागात गेल्या काही दिवसांपासून नक्षलींच्या हालचाली वाढू लागल्या होत्या. ही माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर नक्षलवाद विरोधी दलाने या भागात सापळा रचला होता. नक्षलींची वस्तीस्थाने असणाऱ्या भागांमध्ये गस्त वाढविण्यात आली होती. अखेर मंगळवारी सुरक्षा सैनिकांवर नक्षलींकडून गोळीबार सुरू झाल्यानंतर प्रत्युत्तरात सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 9 नक्षली ठार झाले, अशी माहिती नक्षलविरोधी दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठार झालेले नक्षलवादी ‘पीपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मी’ या संघटनेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व 9 नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची लपण्याची ठिकाणे सुरक्षा सैनिकांनी ताब्यात घेतली असून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणातील दारुगोळा, एक स्वयंचलित रायफल आणि 12 बोअर गन्सचा समावेश आहे.
तीन नागरिकांचा बळी
गेल्या आठवड्यात छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलींनी तीन निरपराध नागरिकांची हत्या केली होती. हे नागरिक त्यांना सहकार्य करण्यास तयार नव्हते. त्यामुळे ते सरकारचे हस्तक आहेत असे समजून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेनंतर या भागातील सुरक्षा वाढविण्यात आली होती. मंगळवारी झालेली चकमक बिजापूर आणि दंतेवाडा यांच्या सीमेवर घडली होती.
अमित शहांची भेट
नुकतीच अमित शहा यांनी छत्तीसगडला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी राज्यसरकारशी नक्षलींचा प्रभाव नष्ट करण्यासंबंधीच्या योजनांवर चर्चा केली होती. छत्तीसगड सरकारने गेल्या 1 वर्षात दंतेवाडा आणि बिजापूर येथील नक्षलींवर सातत्याने कारवाई केली आहे. त्यामुळे या भागांमधील नक्षलींचा उपद्रव काही प्रमाणात कमी झाला. मात्र, आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते अधूनमधून सर्व शक्ती एकवटून हल्ले करतात, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. छत्तीसगडमधून नक्षलींचा नायनाट करण्याची राज्य सरकारची महत्त्वाकांक्षा आहे.