For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समुहाचे नेतृत्व संयमाने करणारे नेताजीराव!

11:26 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
समुहाचे नेतृत्व संयमाने करणारे नेताजीराव
Advertisement

महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांचे प्रतिपादन : नेताजीराव जाधव यांचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात : शुभेच्छांचा वर्षाव

Advertisement

बेळगाव : माणसाच्या जगण्यात आणि कार्यात उत्साह असला की वय पुढे जाऊ शकत नाही, हे नेताजीराव यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवते. त्यांनी बेळगावच्या सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. म. ए. समितीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. समुहाचे नेतृत्व संयमाने करणारे नेताजीराव जाधव आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला गर्दी पाहून अभिमान वाटतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांनी केले. माजी नगरसेवक व म. ए. समितीचे नेते नेताजीराव जाधव यांचा अमृतमहोत्सव सोहळा गुरुवारी मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिजजवळ आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने जयंतराव पाटील बोलत होते.

ते पुढे म्हणाले, बेळगावच्या म. ए. समिती कार्यकर्त्याचा अमृतमहोत्सव सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आणि मी बेळगावला आलो. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नेताजीरावांचा चिरंजीव विजय यांनी आपल्या आई-वडिलांना योग्यवेळी आणि योग्य अशी कारगाडी भेट दिली. नेताजीरावांचे आयुष संघर्ष आणि कष्टात गेले. नेताजीरावांचे वडील कै. नारायणराव हे कारकुनाचे काम करत लग्न जुळविण्याचे कार्य करीत होते. समाजकार्य हा जाधव घराण्याचा इतिहास आहे. त्यांच्या वडिलांकडूनच नेताजीरावांना प्रेरणा मिळाली आहे. आपला बेकरीचा व्यवसाय सांभाळत सामाजिक आणि समितीचे कार्य करताना नेताजीराव यांच्यातील कार्यकर्ता कधीही हरलेला नाही. बेकरी समुहाचे नेतृत्व करून माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्याकडून बेकरी व्यवसायावरील कर माफ करून घेण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे जिथे नेताजीराव जातील तिथे त्या समुहाचे नेतृत्व संयमाने करण्याची धमक त्यांच्यात आहे. पत्रकार म्हणून महापालिकेत प्रत्येक सभेत हजर राहायचे आणि त्याचे वृत्तांकन दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात द्यायचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्यामुळेच सोहळ्याला इतकी गर्दी पाहावयास मिळते ही नेताजीरावांची पुण्याई आहे.

Advertisement

मी सीमाप्रश्नासाठी अनेकवेळा बेळगावला आलो. सीमाप्रश्नासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले. तेव्हापासून त्यांनी सीमाप्रश्नाच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सीमाप्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. या देशामध्ये भिजत घोंगडे ठेवायचे आणि त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे ही सर्वच राज्यकर्त्यांची सवय आहे.  सीमाप्रश्नाचा खटला निर्णयाप्रत येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पूर्ण ताकद लावली पाहिजे, असेही जयंतराव म्हणाले. या देशात व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मात्र, काही ठिकाणी दडपशाही चालू झाली आहे. तुम्ही माझ्यासाठी सोयीचे बोलला नाही तर तुम्हाला वेगळ्या कारणासाठी तोंड दाबण्याची व्यवस्था आम्ही करू. बेळगावमध्येही अशीच दडपशाही दिसते. बेळगावचे मराठी भाषिक सीमाप्रश्नासाठी आंदोलने करतात, बैठका घेतात, त्यांच्यावरील अन्याय थांबला पाहिजे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून इथली दडपशाही थांबविण्यासाठी प्रयत्न करू, तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची राष्ट्रवादीच्यावतीने भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत येथील दडपशाही थांबवावी, यासाठी चर्चा करणार असल्याचे आश्वासन जयंतराव पाटील यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजीराव जाधव अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष व मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. प्रारंभी संगीत शिक्षक शंकर पाटील यांच्या महिला भजन मंडळाने भजन सादर केले. नेताजीराव जाधव यांना मराठा मंदिरपर्यंत अश्वावरून आणण्यात आले. त्यानंतर मान्यवरांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे व्यासपीठापर्यंत जल्लोषी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन जयंतराव पाटील यांनी केले.

त्यानंतर कै. नारायण जाधव व द्रौपदी जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मराठा बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, बेळगाव बेकर्स सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी हंगीरकर, अमृतमहोत्सव समितीचे सेक्रेटरी प्रभाकर भाकोजी, पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, आप्पासाहेब गुरव आदी व्यासपीठावर होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

अमृतमहोत्सव समितीच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नेताजीराव जाधव यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील, नंदा जाधव यांचा सत्कार पल्लवी भाकोजी यांनी केला. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले व बेळगावमधील विविध संघ-संस्थांशी नेताजीराव यांचा निकटचा संबंध आहे. नेताजीराव यांनी मराठा समाज व सर्व जाती-धर्मासाठी कार्य केले आहे. यापूर्वी मराठा समाजाने त्यांच्या वडिलांचा अमृतमहोत्सव साजरा केला होता आणि आज नेताजीरावांचा हा अमृतमहोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सीमाप्रश्नाच्या अनेक लढ्यांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे, असे ते म्हणाले.

सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी ध्येयातून जीवनाची वाटचाल केली की यशस्वी जीवन जगता येते, असे सांगत नेताजीराव यांच्या 75 वर्षांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. राजाराम सूर्यवंशी, माजी नगरसेवक दीपक वाघेला, रणजीत चव्हाण-पाटील, प्रदीप अष्टेकर, मनोहर किणेकर आदींची नेताजीरावांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली. वडिलांच्या सामाजिक कार्याच्या विचारानेच आपण सामाजिक कार्य करण्याचे ठरविले आणि समाजातील सर्व घटकांची प्रामाणिक आणि निष्ठेने सेवा केली. म. ए. समितीचा कार्यकर्ता, पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राबाबत मनोगत व्यक्त केले आणि माझ्या अमृतमहोत्सव सोहळ्याला भरभरून प्रेम दिलं याबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाला नेताजीराव यांचे बंधू बेकर्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव, बेळगाव प्रेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीधर (बापू) जाधव, रमाकांत कोंडूसकर, पुढरी परब, माजी आमदार संजय पाटील, शुभम शेळके, परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, मनोहर सप्रे, मनोहर हलगेकर, शिवाजी हावळाण्णाचे, दामोदर लोहार, शिवाजी सुंठकर, बाळासाहेब काकतकर, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, सुधा भातकांडे, डी. बी. पाटील, मनोज पावशे, शिवाजी बाडीवाले, राजेंद्र भातकांडे, दिनेश कदम आदी उपस्थित होते.  साईगणेश सोसायटी, तुकाराम बँक, पत्रकार विकास ट्रस्ट, बेळगाव बेकर्स सोसायटी, मराठा मंदिर, बलभीम व्यायाम मंडळ ट्रस्ट, मराठा युवक संघ, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, शहापूर, सिद्धिविनायक मंडळ, नवहिंद सोसायटीसह विविध संघ-संस्थांच्यावतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त

अमृतमहोत्सव सोहळ्याला उत्तर देताना नेताजीराव यांनी आपले गुरु व्ही. एस. जाधव यांच्यामुळेच मी घडलो, असे सांगितले व व्यासपीठावरून उतरून आपल्या गुरुंना पुष्पहार अर्पण करून त्यांचे चरण स्पर्श केले आणि गुरुप्रति प़ृतज्ञता व्यक्त केली. यावेळी गुरु आणि शिष्य दोघेही भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले. आपले राजकीय गुरु मालोजीराव अष्टेकर आहेत, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

Advertisement
Tags :

.