नेपाळच्या अंतरिम मंत्रिमंडळाचा विस्तार
पंतप्रधान सुशीला कार्की यांनी केला तीन नेत्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये निदर्शने, प्रचंड हिंसाचार आणि के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हळूहळू शांतता पूर्ववत होत आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी देशाच्या नवीन पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. नेपाळमध्ये काळजीवाहू सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान सुशीला कार्की यांनी सोमवारी त्यांच्या मंत्रिमंडळात तीन मंत्र्यांचा समावेश केला. कुलमन घिसिंग, ओमप्रकाश अर्याल आणि रामेश्वर खनाल यांनी सोमवारी सकाळी नेपाळी राष्ट्रपती भवन ‘शीतल निवास’ येथे मंत्रिपदाची शपथ घेतली.
नेपाळच्या अंतरिम मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार केल्यानंतर तिन्ही मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. कुलमन घिसिंग यांना ऊर्जा, शहरी विकास आणि भौतिक पायाभूत सुविधा मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. ओम प्रकाश अर्याल कायदा आणि गृह मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारतील आणि रामेश्वर खनाल अर्थ मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
मंत्रिमंडळ विस्तारावरून ‘जनरेशन-झेड’ नाराज
सुशीला कार्की यांच्या शपथविधीनंतर अवघ्या 3 दिवसांनी नेपाळचे राजकारण पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर गेले आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडे कार्की यांचे नाव सादर करण्यासाठी लॉबिंग करणारे जनरेशन-झेडचे लोक आता त्यांच्या विरोधात उतरले आहेत. सोमवारी जनरेशन-झेडने पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. ‘हम नेपाळी’ स्वयंसेवी संस्थेचे सुदान गुरुंग यांनी या निदर्शनाचे नेतृत्व केले. या निदर्शनात ज्यांची मुले पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकही सहभागी झाले होते.
पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी
नेपाळी माध्यमांनुसार, सुदान गुरुंग यांच्या नेतृत्वाखाली निदर्शकांनी सुशीला कार्की मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. कार्की पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसताच चळवळीच्या मूलभूत गोष्टी विसरल्या आहेत, असे या निदर्शकांनी म्हटले आहे. कार्की यांच्यावर मनमानी निर्णय घेण्याचा आरोप आहे. कार्की स्थापन करत असलेल्या अंतरिम मंत्रिमंडळात जनरेशन-झेडचे मत विचारात घेतले जात नाही, असा त्यांचा दावा आहे.
सोशल मीडियावरील बंदी आणि कथित भ्रष्टाचाराविरुद्ध नेपाळमध्ये जनरेशन-झेड तरुणांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. तथापि, पोलिसांनी निदर्शनांवर केलेल्या गोळीबारात मोठ्या संख्येने तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार उफाळला. यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी गेल्या मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता तेथे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.
मार्च 2026 मध्ये निवडणुका होणार
नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेच्या दरम्यान, सुशीला कार्की यांची जनरेशन-झेड प्रतिनिधींनी अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. रविवारी सुशीला कार्की यांनी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. पंतप्रधान सुशीला कार्की यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नेपाळमध्ये 5 मार्च 2026 रोजी नव्याने निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे.