नोटांच्या माध्यमातून भारतीय भूभागांवर नेपाळचा दावा
वृत्तसंस्था/काठमांडू
शेजारी देश नेपाळच्या नव्या नोटांवरून वाद उभा ठाकणार आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने एका चिनी कंपनीला स्वत:च्या नव्या 100 रुपयांच्या बँक नोटांच्या छपाईचे काम सोपविले आहे. या नोटांमध्ये नेपाळचा नवा नकाशा सामील आहे. या नकाशात नेपाळने लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी या भारतीय भूभागांना स्वत:चा म्हणून दर्शविले आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाने नव्या नोटांच्या डिझाइनला मंजुरी दिली आहे. 18 जून 2020 रोजी घटनेत दुरुस्ती करत नेपाळने राजकीय नकाशात या क्षेत्रांना सामील केले होते. त्यावेळी भारताने तीव्र आक्षेप नोंदविला होता. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे आमचे अविभाज्य भाग असल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे. नेपाळने नोटांच्या छपाईचे कंत्राट चायना बँकनोट प्रिंटिग अँड मिटिंग कॉर्पोरेशनला दिले आहे. याकरता 9 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च नेपाळला येणार आहे. 2020 मध्ये नेपाळच्या नकाशात अधिकृत बदल करण्यात आल्याने भारतासोबतचे त्याचे संबंध तणावपूर्ण झाले होते. भारताने नेपाळच्या या कृतीला बालिश ठरवत क्षेत्रीय दाव्यांचा कुठलाही कृत्रिम विस्तार स्वीकारार्ह नसल्याचे ठणकावून सांगितले होते.