युएईला हरवून नेपाळची विजयी सलामी
महिलांची टी-20 आशिया चषक स्पर्धा : एस. खडका सामनावीर, इंदू बर्माचे 3 बळी, कविशाची 3 बळींची कामगिरी वाया
वृत्तसंस्था /डंबुला
श्रीलंकेत शुक्रवारपासून सुरु झालेल्या महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात नेपाळने युएईचा (संयुक्त अरब अमिरात) 23 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. 45 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 72 धावा झळकाविणाऱ्या समझना खडकाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या पहिल्या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून युएईला प्रथम फलंदाजी दिली. युएईने 20 षटकात 8 बाद 115 धावांपर्यंत मजल मारत नेपाळला विजयासाठी 116 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर नेपाळने 16.1 षटकात 4 बाद 118 धावा जमवित आपला विजय नोंदविला.
युएईच्या डावात खुशी शर्माने 39 चेंडूत 2 चौकारांसह 36, कर्णधार ईशा ओझाने 2 चौकारांसह 10, टी. सतीशने 1 चौकारासह 9, आर. रिनीताने 1 चौकारासह 9, समायरा धरनीधरकाने 12 चेंडूत 2 चौकारांसह 13, कविशा एगोडगेने 26 चेंडूत 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. युएईच्या डावात 10 चौकार नोंदविले गेले. युएईने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 38 धावा जमविताना 3 गडी गमविले. युएईचे अर्धशतक 47 चेंडूत तर शतक 105 चेंडूत फलकावर लागले. नेपाळतर्फे इंदू बर्मा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 19 धावांत 3 गडी बाद केले. शबनम राय, एम. कृतिका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. युएईचे 3 फलंदाज धावचीत झाले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नेपाळच्या डावामध्ये एस. खडका आणि सिता राणा मगर यांनी सलामीच्या गड्यासाठी 31 चेंडूत 41 धावांची भागिदारी केली. मगरने 1 चौकारासह 7, कविता कुंवरने 2, कर्णधार इंदू बर्माने 6, रुबिना छेत्रीने 8 चेंडूत 1 चौकारासह 10, पूजा महातोने 1 चौकारासह नाबाद 7 धावा जमविल्या. नेपाळच्या डावात 14 अवांतर धावा मिळाल्या. सलामीच्या समझना खडकाने 45 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 72 धावा जमवित आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. नेपाळच्या डावात 14 चौकार नोंदविले गेले. युएईतर्फे कविशा एगोडगेने 12 धावांत 3 तर लावण्या केणीने 9 धावांत 1 गडी बाद केला. नेपाळने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 39 धावा जमविताना 1 गडी गमाविला. नेपाळचे अर्धशतक 41 चेंडूत तर शतक 87 चेंडूत फलकावर लागले. खडकाने आपले अर्धशतक 35 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने झळकाविले. नेपाळने 10 षटकाअखेर 2 बाद 66 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
युएई 20 षटकात 8 बाद 115 (खुशी शर्मा 36, कविशा एगोडगे 22, डी. समायरा 13, ओझा 10, रुबिना छेत्री 10, अवांतर 7, इंदू बर्मा 3-19, शबनम राय, कृतिका एम. प्रत्येकी 1 बळी). नेपाळ 16.1 षटकात 4 बाद 118 (एस. खडका नाबाद 72, रुबिना छेत्री 10, अवांतर 14, कविशा एगोडगे 3-12, लावण्या केणी 1-9).