ना युद्धबंदी, ना करार; फलनिष्पत्ती गुलदस्त्यात
ट्रम्प-पुतीन यांच्यात तीन तास चर्चा : 12 मिनिटांची संयुक्त पत्रकार परिषद : 18 ऑगस्टला झेलेन्स्की अमेरिकेला जाणार
वृत्तसंस्था/ अलास्का
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे जागतिक राजकारणातील दोन अत्यंत प्रभावशाली नेते शुक्रवारी अलास्कामध्ये समोरा-समोर आले. युक्रेनसोबतचे युद्ध थांबविण्यासाठी घेतलेल्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेला दोन्ही बाजूंनी ‘फलदायी’ आणि ‘परस्पर आदरयुक्त’ असे म्हटले असले तरी चर्चेची फलनिष्पत्ती स्पष्ट झालेली नाही. या बैठकीत ठोस तोडगा निघाला नसला तरी आता सोमवार, 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ट्रम्प-झेलेन्स्की यांच्या प्रत्यक्ष भेटीकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. दरम्यान, भारताने ट्रम्प-पुतीन भेटीचे स्वागत करत ‘सकारात्मक पाऊल’ असे म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अलास्कामध्ये भेट घेतली. युक्रेन युद्ध संपवण्यासाठी त्यांची सुमारे 3 तास बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी फक्त 12 मिनिटांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या काळात त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पत्रकार परिषदेदरम्यान ‘आमची बैठक खूप सकारात्मक होती. आम्ही अनेक मुद्यांवर सहमत झालो, परंतु कोणताही करार झाला नाही. तो अंतिम झाल्यावरच करार होईल’, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी या बैठकीला 10 पैकी 10 गुण दिले.
संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी रशियाची सुरक्षा आपल्यासाठी सर्वात महत्वाची असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पुढील बैठक मॉस्कोमध्ये घेण्याचा सल्ला दिला. आपापले मुद्दे मांडल्यानंतर दोन्ही नेते लगेचच व्यासपीठावरून निघून गेले. एकीकडे ही जम्बो चर्चा झाल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातही चर्चा झाल्याचे समजते. झेलेन्स्की यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दीड तास चर्चा केल्याचे स्पष्ट केले. आता झेलेन्स्की 18 ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डीसीला जाऊन ट्रम्प यांना भेटतील. या भेटीपूर्वी शांतता प्रस्थापित करण्यास युक्रेन पूर्ण ताकदीने तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
ट्रम्प-झेलेन्स्की उद्या सोमवारी भेटणार
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दीड तासांहून अधिक काळ चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी तासभर स्वतंत्रपणे चर्चा केली आणि त्यानंतर युरोपीय नेत्यांनाही त्यात सामील करण्यात आले. यावेळी ट्रम्प यांनी त्यांना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या भेटी आणि संभाषणाची माहिती दिली. युक्रेनने ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून युक्रेन, अमेरिका आणि रशियाची त्रिपक्षीय बैठक आयोजित करण्याचे आश्वस्त केले आहे. आता झेलेन्स्की सोमवारी वॉशिंग्टन डीसीला जाऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतील आणि युद्ध संपवण्याबाबत सविस्तर चर्चा करतील. झेलेन्स्की यांनी अमेरिकेकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचे स्वागत करत सर्व मित्र राष्ट्रांचे आभार मानले.
भारताची धाकधूक कायम
जगाचे लक्ष लागलेली डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यातील महाबैठकीतून काहीच निष्पन्न झाले नसले तरी भारताच्या टॅरिफबाबत अजूनही साशंकता वर्तवली जात आहे. पुतीन-ट्रम्प बैठकीत तोडगा न निघणे हे भारतासाठी चिंताजनक आहे. भारतीय मालावर सध्या अमेरिकेत 25 टक्के कर लादले आहे. तसेच व्यापार चर्चा निष्फळ ठरल्यास भारतावर 27 ऑगस्टपासून 50 टक्के कर लादला जाणार आहे. 27 तारखेच्या आत पुतीन-ट्रम्प-झेलेन्स्की चर्चा होऊन तोडगा निघणे भारतासाठी गरजेचे आहे. रशियाने युद्ध न थांबवल्यास भारतावर 50 टक्क्यांपेक्षा जास्त दंडात्मक कर लागण्याची भीती वर्तवली जात आहे.
...अशी झाली भेट
युक्रेनविरुद्धच्या युद्धावर पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत तोडगा निघावा, यासाठी ट्रम्प खूप आग्रही होते. तर पुतीन यांना खूश करण्यासाठी ट्रम्प यांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती. पुतीन यांना घेण्यासाठी ते स्वत: अर्धा तास अगोदरच विमानतळावर जाऊन थांबले. पुतीन यांच्या स्वागतासाठी विमानतळावरच रेड कार्पेट टाकण्यात आले होते. रेड कार्पेटच्या बाजूला एफ-22 जातीची चार लढाऊ विमाने तैनात करुन ठेवली होती. पुतीन त्यांच्या विमानातून बाहेर येताच ट्रम्प यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दोनवेळा उत्साहात हस्तांदोलनही झाले. याचदरम्यान आकाशातून लढाऊ विमाने आणि बी-2 जातीच्या स्पिरिट स्टील्थ बाँबर विमानासह अमेरिकेच्या विमानांचा एक ताफाही गेला. कडक सुरक्षेसाठी हा ताफा सज्ज ठेवण्यात आला होता.
ट्रम्प यांच्या लिमोझिन गाडीतून एकत्र प्रवास
बैठकीच्या ठिकाणी जाण्यासाठी पुतीन यांच्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था केली होती, पण ट्रम्प यांनी माझ्या ऑरस लिमोझिन गाडीतून जाऊया, अशी विनंती करताच पुतीन यांनीही ती तात्काळ स्विकारली. दोन्ही नेते एकाच गाडीतून बैठकीच्या ठिकाणी पोहोचले.