आईवडिलांच्या घराचा शेजार
पाश्चिमात्य देशांमध्ये भिन्न संस्कृती आहे. तेथे अगदी पौगंडावस्थेपासून मुले आईवडिलांपासून वेगळी होताना दिसतात. नेदरलँडस् किंवा हॉलंडमध्ये असेच एक कुटुंब आहे. या कुटुंबाची सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चा आहे. ही कथा काहीही वेगळी आहे. वीरले वेलगुईस नामक एक चोवीस वर्षांची तरुणी आपल्या आईवडिलांच्या जवळ राहते. तथापि, त्यांच्या समवेत रहात नाही. तिच्या आईवडिलांचे स्वतंत्र घर आहे. पण ही तरुणी त्याच घराच्या अंगणात एका छोटेखानी घरात राहते. हे घर तिने स्वत: बांधले आहे. आईवडिलांचे स्वत:चे मोठे घर असताना ही तरुणी त्यांच्याजवळ पण त्यांच्यासमवेत का रहात नाही, असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. या अनोख्या राहण्यासंबंधी तिने जे कारण स्पष्ट केले ते ऐकून अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात. ती शिकण्यासाठी अडीच वर्षे वसतीगृहात राहिली होती. पण त्या जीवनशैलीशी ती जुळवून घेऊ शकली नाही. तिला काही मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागले. आईवडिसांची तिला सारखी आठवण येत होती. गेल्या वर्षी ती इंग्लंडला सुटीसाठी गेली होती, त्यावेळी कॉटेजमध्ये तिने वास्तव्य केले. ते जीवन तिला आवडले. त्यामुळे घरी आल्यानंतर तिने तिच्या वास्तव्यासाठी एक सुवर्णमध्य शोधून काढला, पूर्णपणे वेगळे राहण्यापेक्षा आईवडिलांजवळच पण त्यांच्यासमवेत नव्हे, अशा प्रकारे तिने त्यांच्या घराच्या अंगणातच स्वत:साठी कॉटेज बांधले. अशा प्रकारे तिने एकटे दूर राहणे किंवा त्यांच्यासमवेत राहणे या दोन्ही बाबी टाळल्या आहेत.