नेहा हत्येप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती : विशेष न्यायालय स्थापणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
हुबळी येथील मृत विद्यार्थिनी नेहा हिरेमठच्या हत्येला योग्य न्याय मिळावा, यासाठी या खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला जाणार आहे. तसेच विशेष न्यायालय स्थापन करून खटला वेळेत चालवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सोमवारी शिमोगा विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री नेहाच्या हुबळी येथील घरी गेले नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना आमचे मंत्री, कार्यकर्ते आणि मंत्री एच. के.पाटील यांनी भेट दिली आहे. धारवाडला गेल्यावर भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमच्या कार्यकाळात गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी झाले असून कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. तसेच आम्ही सर्वांचे संरक्षण करीत आहोत. मात्र, भाजपच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडली आहेत, असा आरोपही सिद्धरामय्यांनी केला.
पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना
दुष्काळी मदत न दिल्याने केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार केंद्रीय पथकाने अहवाल आल्यानंतर एक महिन्याच्या आत तोडगा काढावा लागतो. ऑक्टोबर महिन्यात अहवाल सादर करून सहा महिने उलटूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. मी स्वत: पंतप्रधान आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे. 23 डिसेंबरला बैठक बोलावून तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना 2000 ऊपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली आहे. आम्ही 34 लाख शेतकऱ्यांना 650 कोटी ऊपये दिले आहेत. राज्यात चारा व पिण्याच्या पाण्याचा त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे वागलेले नाही
देशाच्या पंतप्रधानांनी आजपर्यंत जे सांगितले त्याची अंमलबजावणी केलेली नाही. कर्नाटकला कर वाटपात अन्याय, 15 मे वित्त आयोगाच्या शिफारशी, दुष्काळात नुकसानभरपाई दिलेली नाही, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आले का? वर्षाला 2 कोटी रोजगार निर्माण झाले आहेत का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? अच्छे दिन आले?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.
प्रकरणात कोणाचेही संरक्षण नाही
नेहाच्या हत्येतील आरोपी फयाजला तासाभरात अटक करून आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत. नेहा या प्रकरणात कोणाचेही संरक्षण करणार नाही. सीआयडी अधिकाऱ्यांचे एक पथक सोमवारी हुबळी येथे जाऊन नेहाच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपासाची जबाबदारी स्वीकारणार आहे. नेहाच्या हत्येत कोणाचाही हात असला तरी याची पर्वा न करता निष्पक्ष तपास करून सरकारला अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच 10-12 दिवसांत तपास अहवाल सरकारला सादर करण्याची मुदतही आम्ही निश्चित केली आहे. याबाबत यापूर्वीच आदेश काढण्यात आला आहे.
-डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री