For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजनाथसिंग-सुलीव्हन यांच्यात वाटाघाटी

06:56 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजनाथसिंग सुलीव्हन यांच्यात वाटाघाटी
Advertisement

महत्वपूर्ण धोरणात्मक विषयांवर संबंध अधिक दृढ करण्यासाठी हालचाली, माहिती आदानप्रदान

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीव्हन यांच्यात महत्वपूर्ण संरक्षण आणि गुप्त माहिती आदानप्रदान या विषयांवर व्यापक चर्चा झाली आहे. राजनाथसिंग सध्या अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी भारत आणि अमेरिका यांच्यात मोठे संरक्षण करार करण्यात आले होते. दोन्ही देशांचे धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला असून सुलीव्हन यांच्याशी त्यांची झालेली चर्चा याच प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिली जात आहे. सिंग यांचा हा प्रथम अमेरिका दौरा आहे.

Advertisement

चर्चेनंतर राजनाथसिंग यांनी ‘एक्स’ वर या भेटीची माहिती दिली. सुलीव्हन यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे भारत आणि अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक बळकट होणार आहे. दोन्ही देशांनी शस्त्रनिर्मिती, गुप्त माहितीचे आदानप्रदान आदी मुद्द्यांवर संयुक्तरित्या काम करण्याची योजना आखली आहे. आधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन संयुक्तरित्या करण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या अनेक शस्त्रनिर्मिती कंपन्यांशीही आपली चर्चा झाली असून ती फलदायी ठरली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या संरक्षणविषयक आवश्यकता समजून घेतल्या असून दोन्ही देशांसमोर समान जागतिक आव्हाने उभी आहेत, अशा अर्थाचा संदेश सिंग यांनी दिला.

मंचाच्या सदस्यांशी चर्चा

भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचच्या (युएसआयएसपीएफ) विविध सदस्यांशी राजनाथसिंग यांनी चर्चा केली. या मंचात अमेरिकेच्या विविध संरक्षण सामग्री निर्मिती कंपन्यांचे प्रतिनिधीही सदस्य या नात्याने समाविष्ट आहेत. अमेरिकेच्या अनेक शस्त्रनिर्मिती कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास सज्ज आहेत .भारतालाही त्यांच्याकडून नव्या तंत्रज्ञानाची माहिती होऊ शकते. महत्वाच्या शस्त्रांची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञानही त्यांच्याकडून प्राप्त होऊ शकते. अशी संयुक्त शस्त्रनिर्मिती केंद्रे भारतात स्थापन करुन दोन्ही देश संयुक्तरित्या शस्त्रोत्पादन करुन जगाला निर्यात करु शकतात, तसेच स्वत:च्या आवश्यकताही पूर्ण करु शकतात, अशी माहिती सुलीव्हन यांच्याची चर्चेनंतर देण्यात आली आहे.

अघी यांचे वक्तव्य

भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अघी यांनीही राजनाथसिंग यांचा अमेरिका दौरा यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील संरक्षणसंबंध अधिक भक्कम झाले आहेत. दोन्ही देशांमधील ही धोरणात्मक भागिदारी आता नव्या क्षेत्रांमध्ये विस्तारत असून त्यामुळे दोन्ही देश परस्परांच्या अधिक जवळ येत आहेत. सायबर क्षेत्र, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान, अवकाश संशोधन आणि क्वांटम विज्ञान अशा वेगाने विकसीत होत असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत ठरु शकतात, असे अघी यांनी शनिवारी स्पष्ट केले.

आतापर्यंतच्या सहकार्याचा आढावा

शनिवारी अमेरिकेचे संरक्षणमंत्री जस्टीन लॉईड यांनी राजनाथसिंग यांच्याशी संरक्षण सहकार्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली होती. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वाचे संरक्षण करारही झाले होते. तसेच दोन्ही नेत्यांनी आतापर्यंतच्या संरक्षण सहकार्याचा आढावाही घेतला. अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीकडून अत्याधुनिक युद्ध विमान इंजिने घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे. या व्यवहारासंबंधीही बोलणी करण्यात आली. पाणबुड्या शोधक आणि संहारक साधने भारताला देण्यास अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी संमती दिली आहे. युद्धविमानांच्या इंजिनांचे 80 टक्के तंत्रज्ञानही भविष्यकाळात भारताला दिले जाऊ शकते, अशी माहिती दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी या भेटीनंतर दिली आहे.

अर्थपूर्ण वाटाघाटींचा दौरा

ड राजनाथसिंग यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अर्थपूर्ण बोलणी

ड दोन्ही देशांचा संयुक्त संरक्षण उत्पादन करुन निर्यात करण्याचा विचार

ड भारत निर्मित तेजस युद्ध विमानांना इंजिने पुरविण्याच्या मुद्द्यावर चर्चा

ड भारतात गुंतवणूक करण्यास अमेरिकेच्या संरक्षण सामग्री कंपन्या सज्ज

Advertisement
Tags :

.