For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाटाघाटी अन धुसफुस

06:43 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाटाघाटी अन धुसफुस
Advertisement

लोकसभा निवडणुकीची घोषणा या महिन्यात कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. भाजपने 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा यात समावेश नाही. त्यामुळे भाजपच्या पहिल्याच यादीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे. दुसरीकडे भाजपासोबत असलेल्या शिवसेनेने जागा वाटपात योग्य सन्मान राखला जावा असा इशारा दिला आहे तर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जास्Aतीच्या जागा मिळण्यासाठी दबावतंत्र सुरू असल्याचे दिसत आहे.

Advertisement

2024 ची लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय स्तरावर जितकी महत्त्वाची मानली जात आहे, तितकीच ती महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे जनतेच्या नजरेतून मुल्यमापन करणारी असणार आहे. ही निवडणूक पंतप्रधान ठरवणारी असली तरी महाराष्ट्रात मात्र ती खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे पण ठरवणारी असणार आहे मात्र प्रश्न असा आहे या दोन्ही पक्षांचे उमेदवार लोकसभेच्या रणांगणात असतील तर ते ठरणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 41 जागांचे पाठबळ तत्कालीन शिवसेना-भाजप युतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभे केले होते, मात्र गेल्या 5 वर्षात सरकार आणि राजकीय पक्षांचीही उलथापालथ झाल्याने आता ती परिस्थिती राहिलेली नाही. भाजपने अबकी पार 400 पारचा दिलेला नारा पूर्ण करण्यासाठी त्यांची सगळी भिस्त ही उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रावरच असणार आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. एका एका लोकसभेच्या उमेदवाराचा विचार हा मायक्रोप्लॅनिंगनुसार भाजप करत आहे. भाजपसोबत शिंदेगटाचे 13 तर अजित पवारांचा 1 खासदार गेला, मात्र भाजप यातील किती लोकांना उमेदवारी देणार याबाबत प्रश्नचिन्ह असून या 14 खासदारांना उमेदवारी मिळणे म्हणजेच सध्या लॉटरी लागण्यासारखे आहे. 2019 ला ज्याप्रमाणे उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला 23 जागा मिळाल्या होत्या त्याप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेला जागा मिळाव्यात अशी मागणी आता शिंदे गटाकडून शिवसेना नेते रामदास कदम यांनी करत भाजपला इशारा दिला आहे. मात्र भाजपकडून शिवसेनेच्या 13 खासदारांनाही उमेदवारी मिळेल की नाही यात शंका आहे.

Advertisement

जागावाटपाच्या वाटाघाटीवरून भाजप आणि शिवसेनेत धुसफुस सुरू झाली असतानाच दुसरीकडे तर थेट स्थानिक पातळीवर उघडपणे नाराजी आणि विरोधाची भाषा होऊ लागल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार असलेल्या गजानन किर्तीकर यांच्या मतदार संघावर भाजप आपला दावा सांगणार यात शंका नाही तर माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि अकलूजच्या मोहिते पाटील घराण्यातून विरोध होऊ लागल्याने माढाचा तिढा कसा सुटतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे सातारा लोकसभेतील विद्यमान खासदार हे राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आहेत. आता ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सोडल्यास छत्रपती उदयनराजे घड्याळावर निवडणूक लढविणार का? हाच प्रश्न आहे कारण अजित पवारांच्या पक्षाने ‘घड्याळ जुने, वेळ नवी’ अशी नवी स्लोगन केली असली तरी साताऱ्यात मात्र भाजप-राष्ट्रवादी ही युती नवी असली तरी राजे आणि पवार यांचे वैर जुने आहे. मावळ लोकसभा मतदार संघातही पार्थ पवारांचा पराभव केलेले श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचा विचार करता या दोन्ही जागांवर 2019 ला शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. कल्याण येथून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ.श्रीकांत शिंदे तर ठाण्यातून उध्दव ठाकरेंसोबत असलेले खासदार राजन विचारे, मात्र सध्या भाजपकडे असलेल्या कल्याणच्या जागेवर भाजप दावा कऊन ठाण्याची जागा डॉ. श्रीकांत शिंदे यांना सोडणार असल्याची चर्चा आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर भाजपचाच उमेदवार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ठणकावून सांगतात. भाजपकडून या मतदार संघातून नारायण राणे हे भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा असताना राणे यांनी मात्र आपण लढणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे येथून उद्योsगमंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र सामंत कोणत्या चिन्हावर लढणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2019 च्या जागावाटपात शिवसेनेकडे असलेल्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी या जागेवरही भाजप दावा करत असेल तर हे योग्य नसल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी ठणकावून सांगितले. सध्याच्या घडीला शिवसेनेतून कोणाला उमेदवारी मिळेल हे आजतरी कोणीही सांगू शकत नाही. स्वत: एकनाथ शिंदे पण, मात्र गोव्याचे मुख्यमंत्री शिवसेनेकडे असलेल्या जागेवर भाजपचाच उमेदवार असणार हे ठणकावून सांगतात, कधी काळी महाराष्ट्रात लहान भाऊ असलेल्या भाजपने 2014 नंतर मात्र पित्याची भूमिका घेतली. भाजपच्या वळचणीला गेलेल्यांना आता भाजप ठरवेल त्याच धोरणानुसार वागावे लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मात्र वाटाघाटीत कसोटी लागणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर सामील होणार की नाही याबाबत अद्याप किंतु परंतु आहे, प्रकाश आंबेडकर यांच्या अवास्तव मागण्या यामुळे वंचित बहुजन आघाडीबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसल्याने महाविकास आघाडीचे जागावाटप लांबण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे 7 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. गेल्या काही वर्षातील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल बघता जो पक्ष त्या त्या राज्यातील आघाडी किंवा युती शिवाय लढत त्रिशंकु परिस्थिती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असेल तर म्हणजेच, कोणाच्या तरी फायद्यासाठी किंवा मतांच्या विभाजनासाठी अशा पक्षांना जनतेने थेट नाकारल्याचे बघायला मिळत आहे. याचे उत्तम उदाहरण कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुमारस्वामी यांना लोकांनी दिलेला कौल. हा कौल बघता राजकारणातील सब कॉन्ट्रॅक्टर असणाऱ्या पक्षांना योग्य तो संदेश जनतेने दिला.

राज्यातील भाजप नेत्यांना प्रतिक्षा आहे ती दुसऱ्या यादीची कारण पहिल्या यादीने भाजपच्या राज्यातील नेत्यांचे चांगलेच टेन्शन वाढवले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नावही पहिल्या यादीत नसणे त्यात कृपाशंकर सिंग यांची उत्तरप्रदेशातील जौनपुर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर होणे आणि ही उमेदवारी कोणी जाहीर केली विनोद तावडे यांनी. जे तावडे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते असताना त्यांनी कृपाशंकर सिंग यांच्या बेहीशोबी मालमत्ता प्रकरणाविरोधात मोठी मोहीम उघडली होती. त्यामुळे धक्कातंत्र आणि भाजप हे समीकरण असल्याने दुसऱ्या यादीत कोणाला धक्का बसणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.