अगसगे-चलवेनहट्टी मुख्य रस्त्यावर कोसळलेली झाडे हटविण्याकडे दुर्लक्ष
वाहनधारकांना नाहक त्रास : वनखात्याने त्वरित झाडे हटविण्याची मागणी
वार्ताहर/अगसगे
गेल्या आठवडाभरापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे अगसगे आणि चलवेनहट्टी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. मात्र अद्याप ती झाडे हटविली नसल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठा त्रास होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी अपघात देखील घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. अगसगेच्या मुख्य रस्त्याच्या अर्ध्या रस्त्यावर झाड पडले आहे. तसेच चलवेनहट्टीच्या मुख्य रस्त्यावर देखील झाड रस्त्याच्या अर्ध्या रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे बस, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, बैलगाडी, सायकलस्वार, ट्रक, टिप्पर या वाहनांना दररोज नाहक त्रास होत आहे. या रस्त्यावरून अगसगे, चलवेनहट्टी, म्हाळेनहट्टी, हंदिगनूर, बोडकेनहट्टी, कुरीहाळ, राजगोळी व इतर गावांची वाहने सतत या रस्त्यावरून ये-जा करीत राहतात. मात्र झाडे कोसळून चार दिवस झाले तरी संबंधित खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी वनखात्याने ही झाडे रस्त्यावरून हटवून रस्त्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी होत आहे.