जांबोटी-खानापूर रस्त्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष
रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर : चिखलामुळे वाहने अडकून पडण्याच्या घटना : अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था दयनीय : ब्रिटिशकालीन पूलवजा मोरी कमकुवत
जांबोटी/हणमंत जगताप
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या विकासाकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झाले असून, अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच वाढत्या अवजड वाहतुकीमुळे देखील या रस्त्याची अक्षरश: वाताहत झाली असून खराब रस्त्यामुळे अनेकवेळा या मार्गावरील आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली होती. तसेच भविष्यात रस्त्याचा विकास केला नसल्यास आंतरराज्य वाहतूक कोलमडण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत्त-जांबोटी राज्य महामार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. सुमारे 30 वर्षांपूर्वी या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक चालते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे वाहनधारकांसह या भागातील नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या विकासाचा व रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जांबोटी-खानापूर रस्त्याचे अंतर एकूण 18 किलोमीटर आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी कर्नाटक राज्य महामार्ग विकास निधी अंतर्गत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र या रस्त्याची रुंदी केवळ 3.5 मीटर इतकी अरुंद असल्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक गंभीर समस्यांचा मुकाबला करावा लागतो. या रस्त्यापैकी खानापूरपासून ते मोदेकोप फाट्यापर्यंत 9 किलोमीटर रस्त्याचे दोन-तीन वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आल्यामुळे या रस्त्याची रुंदी 5.5 मीटर करण्यात आली आहे. परंतु मोदेकोपपासून ते जांबोटीपर्यंतच्या दहा किलोमीटर रस्त्याची रुंदी केवळ 3.5 मीटर राखण्यात आली आहे. हा रस्ता संपूर्ण जंगलमय प्रदेश तसेच अवघड घाट व नागमोडी वळणांचा असल्यामुळे, अरुंद रस्त्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवत आहेत. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक चालते. मात्र रस्ता एकेरी वाहतुकीचा असल्यामुळे वाहनधारकांना बाजू देताना वाहने रस्त्याच्या बाजूला गेल्यास ती रुतून बसण्याचा धोका असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहने अडकून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच अवजड वाहने अडकल्यामुळे इतर वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत असल्यामुळे बससेवा देखील ठप्प होत आहे. त्यामुळे या भागातील प्रवासी व विद्यार्थीवर्गांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय अरुंद रस्त्यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये अनेकांचा बळी जात आहे.
अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा
जांबोटी-खानापूर रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा देण्यात असला तरी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे पावसाळ्dयापूर्वी या रस्त्याचा बराचसा भाग सुस्थितीत होता. मात्र यावर्षी बसलेला अतिवृष्टीचा फटका तसेच बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील कुसमळी नजीकच्या ब्रिटिशकालीन पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी घातल्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक गोवा-जांबोटी-खानापूर अशी वळविण्यात आल्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्याच्या दुर्दशेमध्ये अधिकच भर पडली आहे. जांबोटी-खानापूर महामार्ग अनेक ठिकाणी खचला असून मोठ्या प्रमाणात ख•dयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच रस्त्याच्या बाजूपट्ट्या देखील खचल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने रस्त्यावरील ख•dयांची दुरुस्ती केवळ माती घालून करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरून गोवा, धारवाड, हुबळी, ऊत्तर कर्नाटकमधील महत्त्वाची ठिकाणे तसेच महाराष्ट्र, कोकण आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक चालते. तसेच हा रस्ता बेळगाव-चोर्ला-पणजी व बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अत्यंत जवळचा रस्ता असल्यामुळे, वाहनधारक इंधन व वेळेची बचत करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सुमारे दहा वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आलेल्या या रस्त्याची अवस्था सद्यस्थितीमध्ये अत्यंत दयनीय बनली आहे. तसेच रस्त्याची रुंदी केवळ 3.5 मीटर असल्यामुळे अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याअंतर्गत येणाऱ्या खानापूर-परिश्वाड या रस्त्याचे रुंदीकरण करून या रस्त्याचा विकास साधण्यात आला आहे. मात्र जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या विकासाकडे अनेक वर्षापासून शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याला वाली कोण, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
खासदार-आमदारांनी लक्ष घालावे
आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या जांबोटी-खानापूर रस्त्याच्या विकासाकडे शासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, आमदार विठ्ठल हलगेकर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेळगाव विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष घालून जांबोटी-खानापूर रस्त्याच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर करून या रस्त्याच्या विकासाच्या कामाला चालना द्यावी, अशी मागणी होत आहे.
कमकुवत पुलांचा धोका
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर आजही अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन पुलवजा मोरी अस्तित्वात आहेत. मात्र ही ब्रिटिशकालीन पूल पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनली आहेत. दिवसेंदिवस अधिकच कमकुवत बनत चालली आहेत. स्टोन स्लॅब प्रकारात मोडणारे पूल व मोरी वाढत्या अवजड वाहतुकीमुळे कमकुवत बनली असून कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता असल्यामुळे, ही सर्व पुलवजा मोरी नवीन बांधण्याची मागणी होत आहे. तसेच या महामार्गावरील महत्त्वाचा पूल असलेल्या मलप्रभा नदीवरील शंकरपेठच्या पुलाची देखील दुर्दशा झाली असून हा पूलदेखील वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे निकामी झाले आहेत. तसेच पुलावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्यामुळे विशेषत: रात्रीच्या वेळी वाहनधारकांची मोठी कुचंबना होते. तसेच या मार्गावरील ओतोळी नजीकच्या नाल्यावरील पुलाच्या एका बाजूचा रस्तादेखील खचला असून रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.