बैलूर अप्रोच रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
रस्त्याची अक्षरश: चाळण : चार कोटीचा निधी मंजूर होऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष : चोर्लामार्गे होणारी अवजड वाहतूक वळविल्याचा परिणाम
वार्ताहर/जांबोटी
वाढत्या अवजड वाहतुकीमुळे बैलूर अप्रोच रस्त्याची अक्षरश: धूळदाण उडाली आहे. खराब रस्त्यामुळे बैलूर गावच्या नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 4 कोटीचा निधी मंजूर होऊन देखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. बेळगाव-चोर्ला या मुख्य रस्त्यापासून ते बैलूर गावापर्यंतच्या अप्रोच रस्त्याचे अंतर सुमारे 5 किलोमीटर आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची पार दुर्दशा झाली होती. परंतु रस्त्याची तात्पुरती डागडूजी करून कशीतरी बससेवा नागरिकांनी सुरू ठेवली होती. मात्र बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील मलप्रभा नदीवरील कुसमळी नजीकचा तात्पुरता पूल गेल्या दीड महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे वाहून गेल्यामुळे, बेळगाव-चोर्ला-गोवामार्गे होणारी संपूर्ण वाहतूक बेळगाव-बैलूर- जांबोटी-गोवामार्गे वळविण्यात आली. त्यामुळे वाढत्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची अक्षरश: धूळधाण उडाल्याने बैलूरसह या परिसरातील नागरिकांना रस्त्याअभावी नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
खड्ड्यांमुळे आयशर टेम्पो पलटी
सध्या या भागात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्यामुळे तसेच वाढत्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची अक्षरश: चाळणच झाली आहे. रस्त्यावर नावालाच डांबर शिल्लक आहे. खड्यांमुळे रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळणे देखील वाहनधारकांना दुरापस्त झाल्यामुळे अपघाताच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. सद्यस्थितीमध्ये बैलूर अप्रोच रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. शनिवारी रात्री खड्ड्यांतून वाट काढताना मालवाहू आयशर टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या रस्त्यावरील अवजड वाहतूक अशीच सुरू राहिल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चार कोटीचा निधी मंजूर होऊन देखील दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमधून लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी वर्गाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
उपोषणाचा इशारा, परंतु दुरुस्तीकडे दुर्लक्षच
बैलूर अप्रोच रस्त्याची वाढत्या अवजड वाहतुकीमुळे झालेल्या दुरवस्थेची दखल घेऊन खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी बैलूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करावे. अन्यथा उपोषण करण्याचे लेखी निवेदन संबंधित अधिकारी वर्गाना दिले आहे. तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांनीसुद्धा बैलूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्याचा आदेश संबंधित अधिकारी वर्गाना दिला आहे. मात्र अद्याप रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात कार्यवाही शून्यच असल्यामुळे बैलूर रस्त्याला वाली कोण, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तरी सा. बां. खात्याच्या वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.