महात्मा फुले रोडवरील गटारींच्या सफाईकडे दुर्लक्ष
दुर्गंधीचा नागरिकांना मनस्ताप : स्लॅब फोडून देखील गटारी तुंबूनच : तातडीने गटारीची सफाई करण्याची मागणी
बेळगाव : गटारींची सफाई करण्यासाठी महात्मा फुले रोडवरील गटारींवर घालण्यात आलेले काँक्रीटचे स्लॅब महिनाभरापूर्वी ठिकठिकाणी फोडण्यात आले आहे. मात्र अद्यापही गटारींची सफाई करण्यात आलेली नाही. कचरा तसाच गटारीत तुंबून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत महापालिकेला कळवून देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने रहिवासी व व्यापाऱ्यांवर दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ आली आहे. महात्मा फुले रोडवरील गटारीवर काँक्रिटचे स्लॅब घालण्यात आले आहे. त्यामुळे गटारीतील सांडपाणी वाहून जाण्यास ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर केरकचरा प्लास्टिक अडकून पडल्याने गटारीतील पाणी वाहून जाण्याऐवजी तुंबून बाहेर येत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अलीकडेच नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी महापालिकेच्या बैठकीत महात्मा फुले रोडवरील गटारीची समस्या मांडली होती. त्यानंतर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि मनपाच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती.
मनपाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी
पाहणीनंतर गटारीवरील स्लॅब फोडून स्वच्छता करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यानुसार महिनाभरापूर्वी गटारीवरील काँक्रिटचे स्लॅब ठिकठिकाणी फोडण्यात आले आहे. मात्र त्यातील कचरा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना तसेच व्यापाऱ्यांना या गटारी म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिना उलटला तरी देखील गटारीची सफाई करण्यात आली नसल्याने पावसाळ्यात सांडपाणी वाहून जाणे कठीण होणार आहे. त्यामुळे तातडीने महापालिकेने याकडे लक्ष घालून गटारीची सफाई करावी, अशी मागणी केली जात आहे.