नकारात्मक निकालांमुळे शेअरबाजार प्रभावीत
सेन्सेक्स 501 अंकांनी घसरला : आशिया बाजारात संमिश्र स्थिती
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यात अंतिम दिवशी शुक्रवारी पुन्हा सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये आशियाई बाजारांकडून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे बाजाराची पडझड झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या दिग्गज कंपन्यांच्या निकालांपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध दृष्टिकोन बाळगला आहे. कंपन्यांच्या नकारात्मक तिमाही निकालांमुळे बाजारात घसरण दिसून आली. याशिवाय खासगी बँक आणि वित्तीय शेअर्समधील घसरणीमुळे शेअरबाजार प्रभावीत झाला आहे.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 70 अंकांनी घसरून 82,193.62 वर उघडला. अंतिम क्षणी मात्र सेन्सेक्स 501.51 अंकांनी घसरून 81,757.73 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 143.05 अंकांनी घसरून 24,968.40 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, अॅक्सिस बँक 5.25 टक्क्यांसोबत सर्वाधिक घसरणीसह बंद झाली. कोटक महिंद्रा, एचडीएफसी बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोटक बँक, भारती एअरटेल, टायटन, इटरनल, पॉवर ग्रिड आणि टेक महिंद्रा हे प्रमुख घसरणीसह होते. दुसरीकडे, बजाज फायनान्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि एम अँड एम यांचे समभाग हे सर्वाधिक तेजीत राहिले.
क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टीत खासगी बँक 1.46 टक्क्यांनी घसरून बंद झाली. निर्देशांकात समाविष्ट असलेल्या अॅक्सिस बँक, आरबीएल बँक, कोटक बँक आणि एचडीएफसी बँकेने 5 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली.
याशिवाय, वित्तीय सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, ऑटो, एफएमसीजी, रिअल्टी, तेल आणि वायू आणि फार्मा हे सर्व घसरणीसोबत बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी मेटल्स, मीडिया आणि आयटीमध्ये वाढ नोंदवली गेली. आशियाई बाजारात शुक्रवारी संमिश्र कल दिसून आलेला पाहायला मिळाला आहे.