नितू, प्रिती, मंजू उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व मुष्टीयुद्ध फेडरेशनतर्फे येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत यजमान भारताचे स्पर्धक नितू, प्रिती आणि मंजू यांनी आपल्या वजनगटात प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.
येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी खेळवण्यात आलेल्या महिलांच्या 48 किलो वजनगटातील लढतीतील भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती नितू गनघासने कोरियाच्या डोयेन केनचा तांत्रिक गुणावर पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. त्याचप्रमाणे महिलांच्या 54 किलो वजनगटात भारताच्या प्रितीने रुमानियाच्या पेरीजॉकचा 4-3 अशा गुणांनी पराभव उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिलांच्या 66 किलो वजन गटात भारताच्या मंजू बंबोरियाने न्यूझीलंडच्या केरा व्हेरारुवर 5-0 अशी एकतर्फी मात करत पुढील फेरीत स्थान मिळवले. 48 किलो गटातील नितूला गेल्या विश्व महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली होती.
महिलांच्या 63 किलो वजनगटात भारताच्या शशी चोप्राने केनियाच्या मेवांगी टेरेसाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदक विजेती जस्मीन लंबोरियाने टांझानियाच्या अॅम्ब्रोसचा तांत्रिक गुणावर पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. मात्र महिलांच्या 70 किलो वजन गटात भारताच्या श्रुती यादवला पहिल्याच फेरीत चीनच्या झोयु पॅनकडून 0-5 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली होती. 60 किलो गटात लंबोरियाने केवळ 90 सेकंदात पहिल्या फेरीत लढत जिंकली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या निखत झरीनने प्रतिस्पर्ध्यावर मात करत पुढील फेरीत स्थान मिळवले होते.