For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीरजने जिंकली पॅरिस डायमंड लीग

06:40 AM Jun 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
नीरजने जिंकली पॅरिस डायमंड लीग
Advertisement

पहिल्याच प्रयत्नात 88.16 मीटरचा थ्रो : जर्मनीच्या ज्युलियन वेबरला दुसरे स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

भारताचा अव्वल भालाफेकपटू व दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ही स्पर्धा जिंकली आहे. त्याने अँडरसन पीटर्स व जूलियन वेबरसारख्या तगड्या खेळाडूंना पराभूत करत पॅरिस डायमंड लीगच्या विजेतेपदास गवसणी घातली आहे. नीरजने डायमंड लीगच्या पॅरिस फेरीत त्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. फायनलमध्ये नीरजने पहिल्या प्रयत्नात 88.16 मीटर सर्वोत्तम फेकीसह या मोहीमेची सुरुवात केली. हा प्रयत्न त्याला अव्वलस्थानावर कायम ठेवण्यास पुरेसा ठरला. नीरज समोर मागील दोन स्पर्धेत तगडी टक्कर देणाऱ्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरचे आव्हान होते. यावेळी मात्र नीरज त्याच्यावर भारी पडला. जर्मनीच्या वेबरला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Advertisement

पहिल्या प्रयत्नात 88.16 मीटर फेकीसह जबरदस्त सुरुवात करणाऱ्या नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.10 मीटर अंतर भाला फेकला. तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्न फाउल ठरल्यावर सहाव्या प्रयत्नात नीरजने 82.89 मीटर लांब भाला फेकल्याचे पहायला मिळाले. तीन प्रयत्न फसले. एवढेच नाही तर यावेळी 90 पारचा डावही साधता आला नाही. पण पहिल्या प्रयत्नातील फेकी सगळ्या स्पर्धकांमध्ये भारी ठरली अन् अव्वल क्रमांकावर राहत त्याने स्पर्धा गाजवली.

मागील स्पर्धेतील पराभवाचा काढला वचपा

पॅरिसमधील स्पर्धेआधी दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरजने 90.23 मीटरसह हंगामातीलच नव्हे तर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट थ्रोची नोंद केली होती. पण यावेळी जर्मनीच्या ज्युलियन वेबरने शेवटच्या प्रयत्नात 91.06 मीटर अंतरावर भाला फेकत नीरजला मागे टाकले होते. मे 2025 मध्ये पोलंड येथील स्पर्धेतही वेबरने 86.14 मीटर थ्रोसह नीरजला मागे टाकत स्पर्धा गाजवली होती. या स्पर्धेत नीरज 84.14 मीटरसह जर्मनीच्या खेळाडूच्या मागे राहिला होता. पण यावेळी मात्र नीरजने त्याला मागे टाकले. याशिवाय, ब्राझीलच्या लुइस मॉरिसियो दा सिल्व्हाने 86.62 मीटरपर्यंत भाला फेकून तिसरे स्थान पटकावले.

आठ वर्षानंतर पॅरिसमधील स्पर्धेत सहभागी

जवळपास आठ वर्षांनी नीरज पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत सहभागी झाला होता. 2017 मध्ये नीरज च्84.67 मीटर थ्रोसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मे 2025 मध्ये दोहा डायमंड लीग स्पर्धेत 90 मीटर पारचे ध्येय साध्य केल्यावर नीरज चोप्रा यंदाच्या स्पर्धेत आत्मविश्वासाने मैदानात उतरला अन् त्याने ही स्पर्धाही जिंकूनही दाखवली. दरम्यान, नीरज आता 24 जून रोजी ओस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक 2025 अॅथलेटिक्स मीटमध्ये मैदानात उतरेल. चेक प्रजास्ताकमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.

Advertisement
Tags :

.