नीरज चोप्राचा ‘टी-शर्ट’ पोहोचला जागतिक अॅथलेटिक्स वारसा संग्रहात
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे टी-शर्ट परिधान केले होते ते प्रतिष्ठित जागतिक अॅथलेटिक्स वारसा संग्रहात समाविष्ट करण्यात आला आहे. विद्यमान जागतिक विजेता आणि पॅरिस ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेता चोप्रा हा अशा 23 खेळाडूंपैकी आहे ज्यांच्या स्पर्धेतील सहभागाशी निगडीत वस्तूंना या संग्रहात स्थान दिले गेले आहे.
‘आमचा ऑलिम्पिक संग्रह अद्ययावत करताना पॅरिसमधील पदकविजेत्या त्रिकूटाकडून म्हणजे यारोस्लाव्हा माहुचिख, थे लाफाँड आणि नीरज चोप्रा यांच्याकडून मिळालेल्या देणग्या जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतो’, असे वर्ल्ड अॅथलेटिक्सचे अध्यक्ष सेबॅस्तियन को यांनी म्हटले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील ज्या इतर पदकविजेत्यांनी देखील या अद्वितीय संग्रहात योगदान दिले आहे त्यामध्ये युक्रेनच्या यारोस्लाव्हा माहुचिखचा समावेश होतो. तिने सिंगलेट, नेम बिब आणि शॉर्ट्स दान केले आहे. यारोस्लाव्हाने यावर्षी ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्यापूर्वी पॅरिस डायमंड लीगमध्ये उंच उडीचा जागतिक विक्रम मोडीत काढला होता.
नीरज हा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरून त्याने टोकियोमध्ये इतिहास रचला होता. पॅरिसमध्ये त्याने 89.45 मीटर भालाफेक करून रौप्यपदक पटकावले होते. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी अर्शद नदीमने 92.97 मीटर अंतरावर भालाफेक केल्याने नीरज आपले सुवर्ण राखून ठेवू शकला नव्हता. अलीकडेच नीरजने कारकिर्दीतील एक नवीन अध्याय सुरू करताना भालाफेकमधील महान खेळाडू जॅन झेलेझनी यांना नवीन प्रशिक्षक बनविले आहे. झेलेझनी हे तीन वेळचे ऑलिम्पिक विजेते आणि विश्वविजेते असून चोप्रासाठी खूप पूर्वीपासून आदर्श राहिलेले आहेत.